शिर्षक वाचून कुणीही अचंबेल. मीही लिहितांना ! पण , तसे ते घेऊ नये. केवळ समकालीन. शिवाय जागतिक. एवढाच संबंध. अन् संदर्भ सुध्दा !
१८८९ ला ॲडाॅल्फ हिटलर , १८९३ ला माओ त्से तुंग व १८९१ ला भीमराव आंबेडकर हे तिघेही महाचर्चित जन्माला आले. तिघांत दोन दोन वर्षाचा फरक आहे. हिटलर आंबेडकरांपेक्षा दोन वर्षे मोठे तर माओ दोन वर्षे लहान होते.
तिघांचेही देश निराळे. जर्मनी , चीन , भारत. पार्श्वभूमी निराळी. अडीअडचणी निराळ्या. तिघांत एकमेकात कधी भेट नाही. तरीही , तिघेही आपापल्या देशात लोकनेते ठरत गेले.
यातल्या दोघांना राष्ट्रप्रमुख व्हायची संधी मिळाली. तिसऱ्यानेही प्रयत्न केले. पण अशक्य निघाले. ते दोघे मात्र , मृत्यूपर्यंत राजकीय सत्तेवर होते.
तिघांपैकी एकाने देश घालविला. एकाने देश घडविला. एकाने देशाला दिशा दिली.
तिघांचेही बालपण खडतर होते. जन्म ग्रामीण भागातील. तिघांच्याही जीवनात बाप हा प्रमुख घटक राहीला. बाप बाबतीत आंबेडकर धनी ठरले.
यातुलनेत हिटलर व माओ दु:खी राहीले. दोघांचेही बापलोक खूप संतापी होते. चड्डी ओली होईतो मारायचे. बापांमुळे दोघांचेही बालपण रडण्यात गेले. तिघांच्याही आई मायाळू होत्या. मुलांचाही आईवर जीव होता. माओ ची आई बौध्द स्त्री होती.
हिटलर उपजत चित्रकार होता. माओ मात्र कवी ! आंबेडकरांना संगीताची जाण होती. तिघांचाही लोकनेतृत्वातून उदय झाला. तिघांत हिटलरचे वक्तृत्व मैदानी होते. त्याची देहबोली व शब्दफेक तासनतास लोकांना बांधून ठेवी. द्वेषसूत्रात तो पटाईत होता. तो पटवायचा. तो पेटवायचा. हाईल हिटलर .. हाईल हिटलर आरोळ्या लोकांत फुटत असत.
माओ आणि आंबेडकर यांचे वेगळे होते. त्यांच्या आंदोलनामागे विचारसूत्र होते. तो केवळ राज्यक्रांतीचा निनाद नव्हता. दास्यतेविरुध्दचा संघर्ष होता. एक शोषणमुक्ती होती. एक दु:खमुक्ती होती. शिवाय , सत्ताप्राप्तीनंतर काय करु याचीही स्पष्टता होती. मात्र , दोन्ही विचारसूत्रात व कार्यप्रणालीत खूप फारकतता होती.
हिटलरचा बाप कस्टम अधिकारी तर माओचा बाप शेतकरी होता. आंबेडकरांचे बाप सैन्यात सुभेदार होते. तिघांच्याही आयुष्यात शहरी संस्कृती नंतर आली. त्यांच्या जन्मगावाची नावे हिटलर (ब्रानाऊ), माओ (चांगशा) व आंबेडकर (महू) अशी आहेत.
तिघात माओ अधिक जगले. ते ८३ वर्षे तर हिटलर (५६) व आंबेडकर (६५) वर्षे जगले. तिघांचेही मृत्यूदिन सांगायचे तर , हिटलर (३० एप्रिल १९४५), माओ (९ सप्टेंबर १९७६) व आंबेडकर (६ डिसेंबर १९५६) हे आहेत.
हिटलरला ‘फ्युरर’ , माओला ‘चेअरमन माओ’ व आंबेडकरांना ‘बाबासाहेब’ ही ओळख लोकांनी दिली. याशिवाय हिटलरला ‘फॅसिस्ट’ , माओला ‘कम्युनिस्ट’ व आंबेडकरांना ‘बुध्दिस्ट’ अशीही ओळख आहे.
१९३३ ला हिटलर जर्मनीचा चॅंसलर झाला. नंतर त्याने जगाची हाव केली. भयंकर अशा दुसऱ्या महायुद्धाचा तो उदगाता ठरला. त्यात गचकला. अवध्य .. अजेय .. अशरण हे खोटे निघाले.
सत्तेच्या बळावर हुकूमशहा प्रतिमा ठसविणारा लोकक्षोभापूढे आत्महत्येला प्रवृत्त झाला.
१९३४ ला माओने लाॅंगमार्च काढला. सोबत एक लाख लोक होते. १९३५ ला तो चिनी साम्यवादी पक्षाचा प्रमुख झाला. शेतकरी हा विचारकेंद्राच्या अग्रावर यावा हा माओचा आग्रह असे. त्याने मार्क्सवादाला चीनी पेहराव दिला. ‘क्रांती ही बंदुकीच्या नळीतून येते’ हे त्याचे आवडते सत्तासूत्र होते. सांस्कृतिक क्रांतीशी त्याने स्वतःला बांधून घेतले होते.
हातात भंगार स्वरुपात मिळालेला चीन त्याने महासत्ता केला यात माओचे कर्तृत्व अधोरेखित होते.
१९३६ ला आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची निर्मिती केली. तो तेव्हाचा लक्षवेधी राजकीय पक्ष होता. पूढे, विलक्षण घडामोडीत तो पक्ष गुंडाळायची बाध्यता आंबेडकरांवर आली. नंतर १९४२ ला आंबेडकरांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्यांनी स्वातंत्र्याच्या तीन महिने आधी संविधान सभेला दिलेले राज्यसमाजवादाचे राज्यसूत्र महत्त्वाचे होते. त्यांनी जातीअंता सोबत सामाजिक व आर्थिक विषमता अंतासाठी आयुष्यभर लढा दिला.
आंबेडकर हे कायदापूरक जगण्यावर व सामाजिक-आर्थिक समतेच्या महत्तेवर अपार प्रेम करायचे. धर्म असो की राजकीय सत्ता ती माणसासाठी असते हे त्यांचे विचारसूत्र होते. शेवटीशेवटी त्यांनी प्रबळ राजकीय पक्षासाठी ‘रिपब्लिकन पक्ष’ निर्मितीसाठी प्रयत्न केले.
असा हा तिघां महाचर्चितांचा प्रवास. तिघांपैकी हिटलरचे त्याचे देशात पार विस्मरण झाले. माओ आणि आंबेडकर हे आपापल्या देशात स्मरणाच्या उंचीवर आहेत.
ती उंची रोजच्यारोज वाढतच आहे !
– रणजित मेश्राम