– ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग : शंभर टक्के मतदानाची घेतली शपथ
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे संपूर्ण शहरात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये रेशीमबाग येथील लोकांची शाळा मधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. मंगळवारी (ता.१२) लोकांची शाळा मधील विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती रॅली काढून मतदानाचा जागर केला.
‘मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग’ अर्थात स्वीप कार्यक्रम अंतर्गत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार नागपूर शहरामध्ये शंभर टक्के मतदान व्हावे याकरिता मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मंगळवारी (ता.१२) लोकांची शाळा मधील विद्यार्थ्यांद्वारे जनजागृती करण्यात आली. या अभियानात ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ नागपूर यांनी देखील सहभाग नोंदविला होता.
रॅलीच्या प्रसंगी लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रभुजी देशपांडे, लोकांची शाळाच्या मुख्याध्यापिका रजनी राजूरकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माला केचे, पर्यवेक्षक श्रीकांत देशमुख, ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ नागपूर चे पदाधिकारी सर्वश्री. ॲड. अविनाश तेलंग, विनोद व्यवहारे, डॉ. अरविंद शेंडे, डॉ. भुजाडे, बाबुराव लिखार, राजाभाऊ अंबाडे, प्रमोद अंजनकर, अरुण आनदेव आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित सर्वांनी शंभर टक्के मतदानासाठी पुढाकार घेण्याची शपथ घेतली. लोकांची शाळा येथून मतदार जनजागृती रॅलीला सुरूवात झाली. यानंतर रॅली दसरा रोड, सिरसपेठ, अशोक चौक, रेशीमबाग या मार्गे पुन्हा शाळेत परत आली. रॅलीमध्ये सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
रॅलीच्या यशस्वीतेसाठी नागपूर महानगरपालिकेला लोक शिक्षण संस्थेचे कार्यवाह मनोहर ढोक, उपाध्यक्ष डॉ. वि.स. जोग, कोषाध्यक्ष श्यामकांत पुसदकर यांच्या मार्गदर्शनात शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी आणि पालक प्रतिनिधींनी सहकार्य केले.