– मंडईनिमित्त वधू -वर शोधण्याची सुरू होते मोहीम
कोदामेंढी :- येथे आज बुधवार 6 नोव्हेंबर पासून मंडई उत्सवाला सुरुवात झालेली आहे. उद्या 7 नोव्हेंबर गुरुवारला घरोघरी आलेल्या पाहुण्यामुळे गजबजलेल्या कोदामेंढी नगरीला मंडळीस्थळी जत्रेचे स्वरूप येणार आहे. गावातील चारही वार्डात पाहुण्यांची रेलचेल दिसत आह. इथेच नव्हे तर परिसरातील, गावागावात सध्या असेच वातावरण सुरू आहे. यानिमित्ताने गावागावातून आलेले पाहुणे मंडळी वधू वर शोधण्याची मोहीम सुरू करतात.
दिवाळीचे महत्त्व सर्वांना ठाऊकच आहे. दिवाळी सणानंतर ग्रामीण भागात सर्वाधिक ज्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहिली जाते तो उत्सव म्हणजेच मंडई.मडंई म्हणजेच कि, गावात जणू काही जत्राच असते.व्यवसाय , कामधंदा, नोकरी निमित्त बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या प्रत्येकांना स्वगावी घरी परत येण्याच्या हक्काचा सण .नवीन नातेसंबंध जोडण्यासाठी आणि वर्षभर शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टातून एक दिवस शारीरिक विश्राम मिळुन आनंद व उत्साह वाढविणारा सण म्हणून मंडई उत्सवाकडे पाहिली जाते. दिवाळीत बलिप्रदा सणाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात भाऊ बीजेच्या दिवसापासून तालुक्यातील गावागावात आळीपाळीने मंडईचे आयोजन केले जाते. याच मंडई उत्सवाच्या माध्यमातून झाडीपट्टीतील नाटक, दंडार, भारुड, तमाशा, गोंधळ. लावणी आधी लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य तर सध्या मोठ्या प्रमाणात हंगामा व ऑर्केस्ट्रा च्या माध्यमातून मनोरंजनाचे कार्य दरवर्षीच केले जाते. कलावंत आपल्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी मंडई उत्सवाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात.
गाव खेड्यातील नागरीक मंडई उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. मंडई उत्सवात विविध साहित्याची खरेदी- विक्री केली जाते. घरगुती साहित्य, चैनीच्या वस्तू, गरजेच्या वस्तू, भाजीपाल्याची दुकाने, हॉटेल यासह अनेक प्रकारची विविध दुकाने जागोजागी थाटली जातात. घराघरांत नातेवाईकांच्या गोतावळा जमा होतो. भाऊ बीजे निमित्ताने माहेरवाशीण भावाला ओवाळण्यासाठी माहेरी येतात. पाहुणे मंडळीची मोठी रेलचेल असते. पाहुणे मंडळीसाठी पाहुणचार, चिकन मटणची मेजवानी केली जाते. मंडईच्या दिवशी गावात जणू काही जत्राच भरते.
नव्या युवा पिढीला मंडई म्हणजे काय ?असा प्रश्न आपसूकच पडतो.मंडई म्हणजे एक प्रकारचा वार्षिक हाट अर्थात बाजार. एका अर्थाने जलसा. जत्रा, मेळाच.यात दूर दूरचे तसेच स्थानिक विक्रेते व खरेदीदार, खडी गंमत व गाणी सादर करणारे स्थानिक व अस्थानिक कलावंत आणि बहुसंख्येने खरेदीदार व रसिकांचा मोठा मेळाच भरतो. ग्रामीण भागात कुठे एक दिवस तर, कुठे दोन दिवस मंडई (जलसा) भरत असतो .
ग्रामीण भागात मंडईला विशेष महत्त्व असते. या निमित्त सोयरिकीच्या कामांना विशेष प्राधान्य दिले जाते .त्यामुळे विवाहयोग्य तरुण मुले ,मुलींसाठी मंडई उस्तव हे पर्वणीच ठरत आहे. तरुण- तरुणीसाठी भावी जोडीदाराची निवड करण्याचे मंडई केंद्रस्थान ठरत असून येथून लग्नाचा बार उडविण्याच्या बेत आखला जातो.