सर्वांना सोबत घेत, सन्मान करीत अग्रेसर होणे हेच हिंदूत्व – अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचे प्रतिपादन

– रा. स्व. संघाच्या चंद्रपूर नगर शाखेचा विजयादशमी उत्सव

चंद्रपूर :- भारतात विविधता असू शकते. पण त्यातही सर्वांमध्ये एक समान तत्व आहे, ही ठाम भावना आम्हाला राष्ट्र बनवते. सर्वांना सोबत घेऊन, सर्वांचा सन्मान करीत अग्रेसर होणे हीच हिंदू संस्कृती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हाच विचार आहे. जे भारताचा विरोध करतात ते हिंदुत्वाचा आणि सोबतच संघाचाही विरोध करतात. भारताच्या सांघिकतेवर हल्ला करण्याचा चाललेला प्रयत्न, हा सकल समाजाच्या गंभीर चिंतनाचा विषय असल्याचे प्रतिपादन रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी येथे केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चंद्रपूर नगर शाखेचा विजयादशमी उत्सव रविवार, 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी स्थानिक सिव्हिल लाईन परिसरातील लोकमान्य टिळक विद्यालयाच्या पटांगणावर पार पडला. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून सुनील आंबेकर मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर धनगर जमात सेवा मंडळ तथा पुण्यश्लोक अहल्यादेवी विकास सहकारी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य गणपत येवले, जिल्हा संघचालक तुषार देवपुजारी, तालुका संघचालक लक्ष्मण ओलालवार व नगर संघचालक तथा ज्येष्ठ विधिज्ज्ञ अ‍ॅड. रवींद्र भागवत व्यासपीठावर उपस्थित होते.

सुनील आंबेकर पुढे म्हणाले, सात्विक राष्ट्र शक्तीसंपन्न असणे सुद्धा गरजेचे आहे. शक्ती आणि शील दोन्ही आवश्यक आहे, अन्यथा संतुलन होत नाही. वेदातही म्हटले आहे की, तोच समाज संपन्न होतो जो राष्ट्र म्हणून सामूहिक शक्ती व चारित्र्याची साधना करतो. आज राष्ट्र विरोधी राक्षस मायावी रूप घेऊन पुढे येत आहे. भाषा, जाती, प्रांत, पूजा पध्दतीच्या नावावर भेद निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. परंतु, आम्ही एक राष्ट्र म्हणून आपली अंतर्गत एकता कायम ठेवली तर ही मायावी शक्ती आपल्या देशाचे काहीच बिघडवू शकत नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

रा. स्व. संघाने या देशाला एकसंघ ठेवण्यासाठी प्रदीर्घ साधना केली आहे. संघ 100 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. भविष्यातही संघाच्या कार्याची उन्नती होत राहो, अशी कामना गणपत येवले यांनी केली. प्रास्ताविक व परिचय अ‍ॅड. रवींद्र भागवत यांनी केला. ते म्हणाले, सर्व समाज व वस्तीपर्यंत संघाचे कार्य पोहोचावे यासाठी हा टप्पा महत्त्वपूर्ण आहे. संघ शंभराव्या वर्षात पदार्पण करीत असताना हाच संकल्प स्वयंसेवकांनी घेतला आहे.

शस्त्रपुजनानंतर स्वयंसेवकांनी योगासन, नियुद्ध, दंडक्रमिका, समता प्रात्यक्षिके सादर केली. सुभाषित, अमृतवचन व वैयक्तिक गीतही झाले. यावेळी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर आणि राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिक व स्वयंसेवक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

५९ महिन्याच्या थकबाकीबाबत मनपा सकारात्मक

Tue Oct 15 , 2024
– आमदार सुधाकर अडबाले यांनी घेतली मनपा आयुक्‍तांसह समस्या निवारण सभा नागपूर :- शालार्थ प्रणालीत समाविष्ठ असलेले शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सहाव्‍या वेतन आयोगाची एकूण ५९ महिन्‍यांची थकबाकीची देयके प्रलंबित असल्‍याने मनपा शिक्षक – कर्मचाऱ्यांत नाराजी व्‍यक्‍त होत आहे. त्‍यामुळे आमदार सुधाकर अडबाले यांनी घेतलेल्‍या बैठकीत सदर विषयावर मनपाने सकारात्‍मकतेने सदर विषय सोडवून मनपा कर्मचाऱ्यांना न्‍याय द्यावा, अशी मागणी केली. यावर सहाव्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com