शहरातील महत्वाच्या दोन प्रकल्पांचे पंतप्रधान यांच्या हस्ते उदघाटन

– रामाळा तलाव पुनर्जिवीकरण प्रकल्पाचे भूमिपुजन व सांडपाणी प्रकल्प व संरक्षक भिंत उभारणी उदघाटन  

– भविष्याची गरज लक्षात घेता पाण्याचा दुसरा स्रोत निर्माण करणे आवश्यक – आमदार किशोर जोरगेवार

चंद्रपूर :- भारत देशाला सुंदर स्वच्छ बनवायचे असेल तर प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे. स्वच्छता हीच सेवा आहे, स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या वर्षीची थीम असून स्वच्छता संपन्नतेचा महामार्ग आहे, स्वच्छता सहज प्रवृत्ती होण्याचे मार्गदर्शन मा.प्रधानमंत्री यांनी देशातील विविध उपक्रमांच्या उदघाटन प्रसंगी सांगितले. ते विज्ञान भवन नवी दिल्ली येथून आभासी पद्धतीने मार्गदर्शन करीत होते.

चंद्रपूर मनपातर्फे प्रियदर्शिनी सभागृहात आयोजित कार्यक्रमात शहरातील ५० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या सांडपाणी प्रकल्प व संरक्षक भिंत उभारणी प्रकल्पाचे भूमिपुजन व रामाळा तलाव पुनर्जिवीकरण प्रकल्पाचे प्रधान मंत्र्यांचे हस्ते उदघाटन आभासी पद्धतीने आज सकाळी १० वाजता करण्यात आले. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार,आयुक्त विपीन पालिवाल,गिरीश कुमरवार मुख्य अभियंता चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, अति.आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त रवींद्र भेलावे, रितेश दहिकर तांत्रिक प्रमुख विश्वराज ग्रुप, वंदना हतगावकर, सविता दंडारे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

पंतप्रधानांचे आभासी पद्धतीने मार्गदर्शन झाल्यावर शहराचे आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थितांना संबोधित करतांना सांगितले की, पाण्याचे योग्य नियोजन आणि काटेकोर वापर करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाकांक्षी आहे. यामुळे वीजनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात होणार शुद्ध पाण्याचा वापरही टाळला जाणार आहे. मात्र या शिवाय लवकरच पाण्याचा दुसऱ्या स्रोत तयार करणेही आवश्यक आहे.

माना येथील बंद असलेल्या खदान भागात साठलेले पाणी या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला जोडून या पाण्याचा वापर केल्यास चंद्रपूर वीज केंद्राला अतिरिक्त पाणी आणि नागरिकांना वाढीव शुद्ध पाणी उपलब्ध होईल यादृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे सांगितले. त्याचप्रमाणे अत्याधुनिक उंच कारंजे, लेझर शो, झरपट नदी येथे छोटा सांडपाणी प्रकल्प दाताळा आणि पडोली येथे चौपाटीचा प्रस्ताव तयार करून पर्यटनाला चालना देण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविक करतांना आयुक्त विपीन पालिवाल यांनी सांगितले की, साधारणपणे दररोज १३५ लिटर प्रतिव्यक्ती पाणी वापर करण्यात येतो.वर्तमान परिस्थितीत नदी नाले प्रदूषित झाले आहेत आज लोकार्पण झालेल्या सांडपाणी प्रकल्पामुळे दररोज ५ करोड लिटर पाणी बचत होणार आहे. शहरातील पर्यटन स्थळ रामाळा तलाव, संरक्षण भिंत उभारणी करण्यात आली असून तलावाचे प्रदूषण कमी झाले आहे.

वीज उत्पादनासाठी कोळसा खाणीतून थेट पाईप कनव्हेयरद्वारे वीज केंद्रात कोळसा वाहतुकीमुळे वाहन अपघात, कोळसा चोरीस आळा बसून पर्यावरणपूरक उपक्रम सुरू करण्यात आला त्याचप्रमाणे महानिर्मितीने नागपूर येथे ३२० आणि आता ५० दशलक्ष लिटर असे एकूण ३७० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे महाकाय प्रकल्प पूर्ण करून महानिर्मितीने पाणी बचतीत मोठे योगदान दिले असल्याचे महानिर्मितीचे गिरीश कुमरवार यांनी सांगितले .

दोन्ही महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याकरिता महानिर्मिती-मनपा अधिकारी-कर्मचारी यांनी भरपूर परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ऐश्वर्या भालेराव आणि आभार प्रदर्शन प्रशासकीय अधिकारी नागेश नित यांनी केले.उपायुक्त मंगेश खवले यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.

या प्रसंगी शहर अभियंता विजय बोरीकर,सहायक आयुक्त अक्षय गडलिंग,शुभांगी सुर्यवंशी,संतोष गर्गेलवार, उपअभियंता रवींद्र हजारे, महानिर्मितीचे उपमुख्य अभियंते मिलिंद रामटेके, डॉ.भूषण शिंदे, मनपाचे अधिकारी कर्मचारी तसेच प्रकल्प विकासक विश्वराज कंपनीचे अधिकारी-कर्मचारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हे घ्या धक्कादायक राजकीय स्फोट आणि गौप्यस्फोट

Thu Oct 3 , 2024
पुन्हा एकवार सांगतो कि थंड डोक्याने खून करीत सुटलेल्या माथेफिरूंपेक्षा देखील महा खतरनाक एकमेव शरद पवार, त्यांचे एकमेव दुर्दैव कि ते ज्याला आधी मोठे करतात एकतर ते स्वतःच त्याचा राजकीय खात्मा करून मोकळे होतात किंवा ज्या अनेकांना शरद पवारांनी मोठे केले तेच त्यांना सोडून जातात पण हे क्वचित घडते याउलट जे आपणहून शरद पवारांना सोडून जातात बहुतेकवेळा तुम्ही बाहेर पडा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com