– वर्धा जिल्ह्यात होणार मोठी वस्त्रोद्योग गुंतवणुक औद्योगिक विकासाला मिळणार पाठबळ
– वस्त्रोद्योगाला चालना व विस्तारासाठी वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा )
– एमआयडीसी मध्ये 750 कोटी गुंतवणूक, 15 हजार रोजगार उपलब्ध होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई :- वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी राज्यशासनाच्या उद्योग विभागामार्फत मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. मे.ओफएबी टेक प्रा.लिमिटेड कंपनी ही भारतातील सर्वात मोठा बिझनेस टू बिझनेस स्वरूपाचा उद्योग असून जवळपास 25 हजार कोटींची उलाढाल आहे. या कराराच्या माध्यमातून वस्त्रोद्योगाला चालना व विस्तारासाठी वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा)एमआयडीसी मध्ये 750 कोटी गुंतवणूक करून जवळपास 15 हजार रोजगार उपलब्ध होणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान मेघदूत येथे वस्त्रोद्योग गुंतवणूकिसाठी राज्यशासनाचा मे.ओफए बी टेक प्रा.लिमिटेड कंपनी सोबत सामंजस्य करार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी औद्योगिक विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सचिव विरेंद्र सिंग तसेच मे.ओफए बी टेक प्रा.लिमिटेड कंपनीचे अशिश मोहपात्रा, योगेश मंदानी, राजेश चावडे, विक्रम सिंग, अनुराग सोनी व एल.एल.सोनी उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्यातील नवीन उद्योगांना मिळणार बळकटी
वस्त्रोद्योग गुंतवणुकीसाठी करण्यात आलेल्या करारामुळे वस्त्रनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कच्चा माल, स्वस्त वीज, दळणवळणाच्या सोयी -सुविधा व अल्प दरात उपलब्ध औद्योगिक भूखंड यामुळे हा प्रकल्प लवकर कार्यान्वित होण्यासाठी पाठबळ मिळणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे विदर्भातील औद्योगिकदृष्ट्या कमी विकसित वर्धा जिल्ह्यात नवीन उद्योगांना बळकटी मिळून रोजगार निर्माण होणार आहे.
महिला कारागिरांना रोजगार उपलब्ध होणार
या प्रकल्पामुळे वर्धा जिल्ह्यातील आजुबाजूच्या परिसरातील महिला कारागिरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असून हब ॲण्ड स्पोक मॉडेलद्वारे ग्रामीण भागातही उद्योगांना चालना मिळणार आहे. तसेच कच्चा माल आजूबाजूच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे व त्याचा वापर उद्योगात होईल, त्याचबरोबर या उद्योगामुळे येथील भागातील आर्थिक उन्नती देखील मोठ्या प्रमाणावर होतांना दिसून येईल.