हिंदू संस्थानांची नाहक बदनामी केल्यास अब्रुनुकसानीचा दावा करू – भाजपा खासदार डॉ.अनील बोंडे यांचा इशारा

– देवस्थांनांबाबत गलिच्छ राजकारण करू नका

मुंबई :- महाविकास आघाडीकडून हिंदू मंदिर संस्थानांबाबत संभ्रम पसरवून बदनामी करण्याचा उद्योग सुरू आहे. कोणताही पुरावा नसताना कोराडी येथील श्री. महालक्ष्मी जगदंबा संस्थानाला भूखंड वितरणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. देवस्थानांबाबत गलिच्छ राजकारण करू नये. श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर आणि संस्थानाद्वारे चालवल्या जाणाऱ्या संस्था ह्या बावनकुळे यांच्या अथवा त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या नसतानाही जर जमीनीच्या मुद्द्यावरून चुकीच्या बातम्या माध्यमांमधून मविआचे नेते पेरत असतील तर त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू असा खणखणीत इशारा भाजपा खासदार डॉ.अनील बोंडे यांनी शुक्रवारी दिला. भाजपा प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये डॉ. बोंडे बोलत होते. यावेळी माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. देवस्थानांबाबत गलिच्छ राजकारण करू नये, असेही डॉ. बोंडे यांनी नमूद केले.

डॉ. बोंडे यांनी सांगितले की, ही संस्था बावनकुळे यांच्या मालकीची नसून, त्याचे व्यवस्थापन ट्रस्टद्वारे केले जाते, हे संस्थान व्यावसायिक कार्य करत नाही. दर दोन वर्षांनी संस्थान अध्यक्षांची निवड केली जाते, तशी निवड होऊन सध्या बावनकुळे हे मंदिर संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. हे संस्थान धार्मिक, अध्यात्मिक कार्यातच नव्हे तर सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातही सक्रीय आहे. संस्थानातर्फे चालवल्या जाणा-या अन्नछत्रात रोज जवळपास 5000 गरजूंना जेवण दिले जाते. गरजूंची या ना त्या प्रकारे मदत करतानाच संस्थानामार्फत 800 गरजू , गरीब विद्यार्थ्यांना नाममात्र अशा 1 रुपयात विद्यादान केले जाते. अशाप्रकारे सामाजिक कार्यात काम करणा-या मंदिर संस्थान आणि बावनकुळे यांच्या कार्यपद्धतीवर संशय घेण्याचे हीन काम मविआचे नेते करत आहेत. आपले हात भ्रष्टाचाराने किती बरबटले आहेत हे न पाहता नाहक खोटे आरोप केले जात आहेत. नागपुरमध्ये काँग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांनी किती भूखंडांचे श्रीखंड लाटले आहे यांची यादी आपल्याकडे असल्याचे सांगत डॉ. बोंडे यांनी वानगीदाखल सतीश चतुर्वेदी यांचे कारनामे सांगितले. त्यांच्या नागपूरमधील लोकमान्य टिळक जनकल्याण संस्थेमार्फत तब्बल 3.28 आणि 13.30 हेक्टर जमीन संस्थेच्या नावाखाली लाटली असल्याचा घणाघात डॉ. बोंडे यांनी केला. कुठलेही सामाजिक कार्य न करणा-या या संस्थेला ही जमीन कशी वितरित करण्यात आली असा सवालही त्यांनी केला. अनेक नेत्यांनी जमीनी लाटल्या आहेत तसेच मुस्लीमांच्या अनेक संस्थांनीही जमीन लाटल्याची माहिती असल्याचे डॉ. बोंडे म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्रातील कर्दे गावाला कृषी पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार-2024 प्रदान

Fri Sep 27 , 2024
नवी दिल्ली :- महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 991 गावांपैकी आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 36 गावांची विजेते म्हणून निवड करण्यात आली होती. स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com