जातीय निर्मूलनात मानसशास्त्राची भरीव मदत – आयआयटी दिल्लीचे डॉ. यशपाल जोगदंड यांचे प्रतिपादन

नागपूर :- जातीय निर्मूलनात मानसशास्त्र भरीव मदत करू शकते, असे प्रतिपादन भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी) दिल्लीच्या मानवशास्त्र व समाज विज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. यशपाल जोगदंड यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमाला सोमवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी दीक्षांत सभागृहात पार पडली. यावेळी डॉ. जोगदंड मार्गदर्शन करीत होते.

प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन प्रमुख डॉ. अविनाश फुलझेले यांनी भूषविले. व्याख्याते म्हणून भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी) दिल्लीच्या मानवशास्त्र व समाज विज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. यशपाल जोगदंड यांची उपस्थिती होती. ‘जाती आणि अस्पृश्यतेचे मानसशास्त्र’ या विषयावर पुढे बोलताना डॉ. जोगदंड यांनी देशांमध्ये जातीय व वर्गीय मानसशास्त्राचा अभ्यास होत असल्याचे सांगितले. देशामध्ये जातीय व वर्गीय मानसशास्त्राचा फारसा अभ्यास झालेला नाही. मागील २५-३० वर्षांपासून भारतीय मानसशास्त्राचा नवीन संशोधकांनी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे.

वर्गीय मानसशास्त्राचा विचार हा जगभरात पसरला असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले. मुख्यतः मानसिक प्रक्रिया व वर्तन हा त्यांचा विषय होता. मात्र, भारतात यावर श्रेणीबद्ध विषमतेच्या दृष्टीने कोणीही विचार केलेला नव्हता.जाती-जातीत किंवा समाजामध्ये वैमानस्य निर्माण का होतात?. त्यांची वागणूक परस्परविरुद्ध भेदभावपूर्ण का होते? याचे कारण कोणी शोधले नाही. जातीय मानसिकतेचा परिणाम माणसाच्या मानसिक तसेच शारीरिक तब्येतीवर होत असल्याचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून असे लक्षात आले. त्यामुळे माणसाने भेदभावपूर्ण वागणूक टाळली पाहिजे आणि एकमेकांमध्ये समन्वय कसा निर्माण होईल याचा विचार केला पाहिजे, असे डॉ. जोगदंड म्हणाले. मानसशास्त्र हे जाती निर्मूलनाच्या दृष्टीने बरीच मदत करू शकते. याचे भान बाळगण्याची गरज आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यतेचे मानसशास्त्रीय दृष्टीने विचार व अभ्यास करून जाती उच्चाटनासाठी महत्त्वपूर्ण उपाय सुचविले आहे. त्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जात ही एक विकृत मानसिकता आहे आणि तिचा परिणाम जात पाळणाऱ्याला व जातीचे दुष्परिणाम भोगणारा दोन्हींना होत असतो, असे अध्यक्षीय भाषण करताना डॉ. अविनाश फुलझेले म्हणाले. माणसाचे वर्तन हे माणसाच्या मानसिकतेवर अवलंबून असते आणि मानसशास्त्राशी तिचा अत्यंत प्रभावी संबंध असतो. त्यातून माणूस जातीयता पाळतो. मात्र, हा दोष जातीयता पाळणाऱ्यांचा नसून त्याच्यावर मानसशास्त्रीय आघात करणाऱ्या धार्मिक ग्रंथांचा असून त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, असे डॉ. अविनाश फुलझेले म्हणाले. प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. मोहन वानखडे यांनी केले तर आभार रमेश गजभिये यांनी मानले.

या कार्यक्रमाला शहरातील मोठा सुजाण वर्ग बहुसंख्येने हजर होता. या कार्यक्रमाचे संचालन मिलिंद वालदे यांनी केले. पाहुण्याचा परिचय दिलीपकुमार लेहगावकर यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हेरिटेज वृक्ष कापू नका, त्यांचे संरक्षण करा - मनपा आयुक्त अभिजीत डॉ. चौधरी

Thu Sep 26 , 2024
– विकासकामात अडथळा ठरणाऱ्या हेरिटेज वृक्षांची मनपा आयुक्तांनी केली पाहणी नागपूर :- अजनी रेल्वे परिसरात नवीन पार्किंग आणि विविध प्रस्तावित बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या विविध प्रजातीच्या झाडांची नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (ता. २५) रेल भूमी विकास प्राधिकरण, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य आणि स्वच्छ असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत पाहणी केली. यावेळी त्यांनी विकास कामात अडथळा निर्माण करणाऱ्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com