भाऊंची आठवण

भाऊंचे जाणे तेव्हाही अखरले होते. आजही अखरतेय. क्वचित एखादाच भाऊ होऊ शकतोय. भाऊ लोखंडे होते तसेच ! स्मरणीय .. अविस्मरणीय ..!

जीवन जर सामाजिकतेचे क्रमशः पृष्ठ असेल तर ते वाचावेच लागेल. भाऊ लोखंडे हे लक्षवेधी असे स्वर्णिम पृष्ठ होते. वेधक, उदबोधक अन् भेदक सुध्दा !

कोवीड काळात २२ सप्टेंबर २०२० ला त्यांचे निधन झाले. चार वर्षे होऊन गेली. ती फार मोठी सामाजिक हानी होती. ती आजही आहे.

भाऊ, वक्तृत्वाचे बेताज बादशहा होते. सभागृह असो की जंगी मैदान. भाऊंचे नाणे खणाणत असे. त्यांची प्रसंगावधानतेवर प्रचंड पकड होती. ते हुकमी बोलत.

त्यांच्यासारखे तेच. जगण्यातही असण्यातही कलप केलेले केस भडक रंगांची रंगसंगती टापदार डौलदार चारचौघात आले की नजरा खेचून घ्यायचे. त्यांची भय्या म्हणण्याची शैली, अवीट होती.

ते आवडते होते. तितकेच नावडते ! चविष्ट होते, तितकेच तिखटही ! या अशा दोन्ही बाजू भाऊंच्या प्रबळ होत्या. त्यांची संपादित गुणवत्ता उत्तुंग होती. वाचन अफाट होते. शिवाय चौफेर. त्यांची तुलना कुणाशी करावी ? कुणी दिसत नसे. या अनुत्तरतेतच त्यांची महत्ता असायची.

पाली भाषेचे विद्वान प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख होती. देशभर त्यांची गणना व्हायची. ‘निकाय’ नावाचे सुंदर मासिक त्यांनी काढले होते. त्या मासिकाचे ते संपादक होते. त्यांनी पुस्तके व इतर असे प्रचंड लेखन केलेय.

त्यांच्या संवाद सामर्थ्याने दोन पिढ्या घडल्या. हजारो लोक त्यांना ऐकायला अधीर असतं. ते केवळ ऐकणे नसे. आंबेडकर-बुध्द जगणे असे. संवादावर भाऊंची विलक्षण हुकूमत होती. ते संवादाला अशा वळणावर आणत की, उर्दू शेर चपखल बसे. तात्काळ टाळ्यांचा वर्षाव होई.

ते मराठीत बोलत, ते हिन्दीत बोलत, ते इंग्रजीत बोलत लिहायची त्यांची धारही वक्तृत्वासारखी धाराप्रवाही असे त्यांच्यासोबतचा प्रवास खमंग व्हायचा. हसायला कोणताच कोपरा सुटत नसे. प्रसंगांचा, घटनांचा धबधबा कोसळे. खूप खूप सांगायचे. संगतीत खूप लहान होऊन जायचे. ते उत्तम खवैये होतेच !

ते निमित्त शोधत असत. घरी येऊन काहीतरी देणे भाऊंना आवडे. कधी त्यांच्या घरच्या झाडाची फळे असायची. कधी एखादी भेटवस्तू. ती त्यांची खास खासियत होती.

अखेर अखेर ते खिन्नतेत रमत. त्यातही इतिहास असे. तोही ऐकावासा वाटायचा.भाऊंच्या जगण्याला अर्थ होता. वेगळेपण होते. संदर्भासह संदर्भ होता. ते जेव्हढे दिसले त्यापेक्षा कितीतरी मोठे होते.

त्यांची सदोदित आठवण राहील. भाऊंना स्मरणासह नमन !

 -रणजित मेश्राम

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

 'एकेडी' चे राष्ट्रपती होणे ! 

Tue Sep 24 , 2024
  रोजंदारी ठेका मजुराचा मुलगा देशाचा राष्ट्रपती झालाय ! शेजारच्या श्रीलंकेत हे घडले. गरीबी हलाखीची पार्श्वभूमी असलेले ध्येयी, ध्येयवादाच्या जोरावर राजकारणात यशस्वी होतांनाचे दिसत आहे. अनुरा कुमारा दिसानायके हे ताजे उदाहरण ठरावे. त्यांना सारे ‘एकेडी’ म्हणतात. ते ५५ चे आहेत. एकेडी श्रीलंकेचे नववे नवे राष्ट्रपती झालेले आहेत. गळत्या घरातून आलेले देशाच्या सर्वोच्च पदी जाणे सारे थरारक आहे. एकेडी चे वडील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com