प्रधानमंत्र्यांना गणपतीचे दर्शन घ्यायचे होते. त्यांनी ते घ्यावे. यासाठी सरन्यायाधीशांचेच घर का निवडावे ? हे फार झाले.
प्रधानमंत्री वा सरन्यायाधीश हे जेंव्हा वागतात तेव्हा ते खाजगी नसते. ते देशाचे असते. दोघांनाही लिखित अलिखित जबाबदाऱ्या सांभाळायच्या असतात. ते आद्य असते. तेच कसे निसटू द्यायचे ? इथे ते निसटलेले दिसतेय.
ते दर्शन खाजगी असेल तर सार्वजनिक का केले ? स्वतः प्रधानमंत्र्यांनी ते केले. यातून काय संदेश द्यायचाय. काय साधायचेय. धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून आपण कट्टर हिंदू आहात हे तर राममंदिर पूजेत दिसलेच आहे. आता नवे काय ?
सरन्यायाधीश पीएम ला आमंत्रित करतील हे तर शक्य नाही. प्रधानमंत्री यांनी इच्छा दर्शविली असेल. त्यांचा वारकरी पेहराव ते बऱ्यापैकी स्पष्ट करतय. प्रधानमंत्री प्रसंगप्रेमी आहेतच. प्रसंगाला ‘इव्हेन्ट’करणे. ते लाभदायक करणे. यात ते महातज्ञ आहेत.
प्रधानमंत्री सर्वोच्च पदावर आहेत. एकाअर्थी देशप्रमुख आहेत. त्यांना सर्वत्र असणे आवडते. एकाचवेळी ते देश सांभाळतात. स्वतःचा पक्ष सांभाळतात. तोंडावरील निवडणुका सांभाळतात. अलीकडे जगही सांभाळतात. इथे घोळ होत असेल.
ते देशप्रमुख आहेत, हे आहेच. देशप्रवासाला एक दिशा आहे. ती सर्वसंमतीच्या संविधानाने अधोरेखित केलीय. ती रुजणे रुजविणे संविधानिक संस्थांकडे आहे. त्यातली प्रमुख सरकार ! तीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पडताळणी न्यायपालिकेची असते. न्यायपालिकेला स्वतंत्र, स्वायत्त व प्रभावमुक्त ठेवलेय. ते महत्त्वाचे. अती महत्वाचे. विश्वास, विश्वासार्हता जोडीला असते. ते जपावे.
ठरलेल्या या संहितेला तडा जातोय. गणेश दर्शनाला दुसरेही स्थळ शोधता आले असते. शंका जन्मेल ते करुच कशाला ? या एका प्रसंगाने वागणे उथळ केलेय. माध्यमात ते सार्वत्रिक केल्याने काय साध्य ? सारे क्लेशदायक आहे. तूट मोठी आहे.
पदावर जाणे महत्त्वाचे आहे. तितकेच ते सांभाळणे, आब राखणे हेही महत्त्वाचे असते.
– रणजित मेश्राम