– पृथ्वीवरचे कार्य संपले, अवताराचे सार्थक झाले !! ! दाही दिशांतरी दुमदुमला ध्वनी,घेई समाधी आज महामुनी !!
नागपूर :- रेशीमबागेतील श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भाद्रपद शुद्ध पंचमीला – ऋषीपंचमीला शेगावनिवासी समर्थ सदगुरु गजानन महाराजांचा ११४ वा पुण्यतिथी उत्सव वराडपांडे कुटुंबीय आणि भाविकवृंदाच्याद्वारे उत्साहात संपन्न केला.बऱ्याच वर्षांनी असा योग जुळून आला आहे की गजानन महाराजांची पुण्यतिथी तिथीनुसार आणि तारखेनुसार एकाच दिवशी आली. गजानन महाराजांनी ऋषिपंचमी च्या दिवशी ८ सप्टेंबर १९१० रोजी संजीवन महासमाधी घेतली. रेशीमबागेतील श्रधास्थानात सकाळी ८ वाजता श्री गजानन महाराजांना मंगल अभिषेक, श्रींच्या मूळ फोटोची पंचपरिक्रमा काढून विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर संतकवी कमलासुत रचित श्री संत गजानन अवतरणिका व गजानन विजय ग्रंथाच्या 19 व्या समाधी अध्यायाचं सामूहिक पारायण पठण करण्यात आलं. यानंतर श्री ऋषीपंचमीची कथा सांगण्यात आली. दुपारी १ वाजता श्रींना मंगल आरती, मानसपूजा संपन्न करण्यात आली. संध्याकाळी वै. संतकवी कमलासुत रचित गीत गजानन चा भक्तिगीतांचे सामूहिक पठण करण्यात आले. दुपारपासूनच हजारो भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घेतला.