माणिकराव निष्ठेचे मूर्तिमंत प्रतिक – पक्षप्रभारी रमेश चेन्नीथला यांची स्तुतीसुमने

– लोकांच्या समस्येवर समाधान शोधण्याचे त्यांचे कार्य

– माणिकराव ठाकरे लिखीत पुस्तकाचे थाटात प्रकाशन

यवतमाळ :- ग्रामपंचायत सदस्य ते विविध खात्यांचे राज्यमंत्री, युवक काँग्रेससह प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, विधानपरिषदेचे उपसभापती तर, तेलंगणासह गोवा, दीवदमणचे पक्षप्रभारी अशा विविध पदांवर माणिकराव ठाकरेंनी काँग्रेस पक्षासाठी योगदान दिले. त्यांच्या कार्याबद्दल तुमच्यापेक्षा मी अधिक जाणत नाही. त्यांनी तुमच्या समवेत काम केले. मात्र, माणिकराव ठाकरे पक्षनिष्ठेचे मूर्तिमंत प्रतिक असून त्यांनी कधीही पक्षनिष्ठा सोडली नाही. त्यामुळे ते पक्षश्रेष्ठींचे विश्‍वासू असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले.

ते माणिकराव ठाकरे लिखीत ‘जनसेवेचा माझा प्रवास’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी विचारपिठावर काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, खा. संजय देशमुख, माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे,काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, माजी आ. वामनराव कासावार, ख्वाजा बेग, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे, रिपाईचे डॉ. राजेंद्र गवई आदी उपस्थित होते. चेन्नीथला म्हणाले की, माणिकरावांनी पक्षसंघटनेत सर्वाधिक काम केले. मी युवक काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष असताना ते युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यावेळीच मला त्यांच्या चांगल्या स्वभावाची जाणीव झाली. सात वर्ष ते प्रदेशाध्यक्ष राहिले असताना त्यांना बदलविण्याचा विषय दिल्लीत झाला. मात्र, त्यांना बदलू नये असे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी सांगितले. त्यांच्यामुळे पक्षाला मिळणाऱ्या यशाची चर्चा झाली. माणिकराव हे एक चांगले नेतृत्व असल्याचे राजीव गांधी म्हणाले होते. माणिकरावांनी 10 मुख्यमंत्र्यांसोबत काम केले. त्यात वसंत दादा पाटील, शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. जे काम पक्षाने आम्हाला दिले, ते देश आणि जनतेसाठी माझ्यासह माणिकरावांनीही केल्याचे उद्गार चेन्नीथला यांनी काढले.

महाराष्ट्रात कुठेही जा, माणिकराव ठाकरे यांचे नाव घेतले जाते. जनतेच्या समस्यांवर समाधान शोधण्याचे काम त्यांनी अविरत केले. कोविडच्या काळात ठाकरे यांनी नुसती जनतेला मदत केली नाही तर, फावल्या वेळात त्यांनी आपल्या जीवनातील अनुभवाचे पुस्तक लेखन केले. निष्ठेने काम केल्यानेच त्यांना पक्षाने तेलंगणा राज्याच्या प्रभारीपदी नेमले. त्यांच्यामुळेच तेलंगणात काँग्रेसचे सरकार आल्याचेही चेन्नीथला म्हणाले. आता ते गोवा, दीवदमणचे प्रभारी आहेत. तेथील निवडणुका जिंकण्याचे आव्हान त्यांच्या खांद्यावर आहे. मात्र ते नक्की गोव्यात सत्ता काँग्रेस पक्षाचीच आणतील असेही त्यांनी स्पष्ट केले. माणिकरावांची जीवनकहाणी पुस्तकाच्या रुपातून लोकजागृतीचे काम करेल असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांनी केले. तर संचालन कैलास राऊत व आभार अनिल गायकवाड यांनी मानले.

धडपड ही माणिकरावांच्या जीवनाचा भाग

माणिकराव ठाकरे यांनी लिहिलेले पुस्तक आत्मचरित्राचा भाग आहे. एक चांगले मित्र म्हणून आमच्या दोघांचा 40 वर्षांचा प्रवास आहे. 1985 मध्ये आम्ही दोघेही एकाच वेळी विधानसभेत आमदार म्हणून पोहोचलो. तिथे आमच्यात घट्ट मैत्रिचे नाते जुळले. मात्र विधानसभेत जेव्हा माणिकराव आपल्या भागातील प्रश्‍नांवर बोलायचे तेव्हा, आम्हालाही आश्‍चर्य वाटायचे. तारांकित प्रश्‍न, लक्ष्यवेधी त्यांच्याच लागायच्या. त्यामुळे लक्ष्यवेधी कशी लावली जाते हे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करायचो. वसंत दादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिल्याच सभेत माणिकराव ठाकरे यांचे नाव घेतले. हे नेतृत्व राज्यात ठसा उमटवेल असे ते म्हणाले होते. कापूस, धान, संत्रा इत्यादी शेतकऱ्यांच्या पीकप्रश्‍नांवर न्याय मिळावा म्हणून ते सतत प्रयत्नशील असायचे.

त्यावेळी शरद पवार विरोधी पक्षनेते होते. धडपड की माणिकरावांच्या जीवनाचा भाग राहिलेला आहे. सभागृहात सर्वात तरुण नेते म्हणून ते उठून दिसायचे. पहाटे चार वाजता उठून कामाला सुरुवात करायची असेही गौरवोद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. आमच्या मैत्रित जिव्हाळ्याचे नाते असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. माणिकराव अनेकदा आपले अनुभव माझ्याजवळ सांगायचे. मीच त्यांना म्हणालो, हे सांगत बसण्यापेक्षा लिहून काढा. त्यांनी त्यांचे अनुभव शब्दबद्ध केले. प्रत्येक पदाच्या अनुभवाचे त्यांची अनेक पुस्तके होईल एवढा त्यांचा अनुभव आहे. सभागृहात त्यांनी केलेली अनेक अभ्यासपूर्ण भाषणे अनेकांना ठावूक नाही. त्यामुळे त्यांची पुस्तके भावी पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, असेही थोरात म्हणाले.

त्यांच्या भाग्यात केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद

माणिकरावांची राजकीय उंची प्रचंड मोठी आहे. मात्र त्यांच्या उंचीला राज्यात कॅबिनेट मंत्रिपद मिळाले नाही. कदाचित कुणाच्या भाग्यात काय लिहून असेल हे सांगता येत नाही. त्यांच्या भाग्यात कदाचित त्यांना नियतीने केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद लिहून ठेवले असावे, असेही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.

पुस्तकाची प्रेरणा बाळासाहेब थोरातांमुळे

जनसेवेचा माझा प्रवास या पुस्तक लेखनाची खरी प्रेरणा मला माझे मित्र बाळासाहेब थोरात यांच्यामुळे मिळाल्याचे प्रतिपादन लेखक तथा काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी केले. ते म्हणाले की, बाळासाहेबांसोबत जेव्हा माझे संवाद व्हायचे तेव्हा, ते मला म्हणायचे, माणिकराव तुम्ही आपल्या आठवणी लिहून काढा. त्यांच्यामुळेच कोरोनाच्या संकटात लेखनाची संधी मिळाली. लॉकडाऊनमध्ये घरी बसून अनेकांना मदत करत असतानाच स्वत:चे अनुभव लिहू लागलो. प्रत्येकाने फावला वेळ चांगल्या कामासाठी दिला पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले. मी दोन पुस्तके लिहिण्याचे ठरविले. एक पुस्तक माझ्या प्रशासकीय अनुभवांवर आहे. ग्रामपंचायत सदस्य ते विविध खात्याच्या राज्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेला अनुभव आहे. 10 मुख्यमंत्र्यांसोबत मी काम केले. राज्यातील अनेक मंत्री माझे मित्र होते. त्यांची विचारप्रणाली कशी होती, याचाही अनुभव आहे. संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून सर्व मंत्र्यांशी संबंध आला. विरोधकांसोबतही माझे मैत्रिपूर्ण संबंध राहिले. त्यांचाही अनुभव सोबत आहे. प्रशासकीय स्वरुपातून जनतेची कामे कशी केली हे या पुस्तकात नमूद आहे. तर दुसरे पुस्तक माझे पक्षसंघटनात्मक कामकाजावरील आहे. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस ते अखील भारतीय काँग्रेसमधील पदांच्या अनुभवावर आहे असेही ठाकरे यांनी सांगितले.

माणिकराव मुत्सद्दी नेते : प्रा. वसंत पुरके

एखाद्या माणसात असंख्य प्रकारची प्रतीभा दडलेली असते. त्यामध्ये जिद्द, चिकाटी, परिश्रम व मुत्सद्देगिरीचा संगम माणिकरावांच्या ठायी आहे. ते शांत व संयमी नेतृत्व आहे. कुठे प्रतिक्रिया द्यायची, कुठे मौन धारण करायचे हे त्यांना चांगले ठावूक असल्याचे माजी मंत्री प्रा. वसंत पुरके म्हणाले. जिल्ह्यात कापूस दराचा प्रश्‍न निर्माण झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यवतमाळात आले होते. त्यांनाही माणिकराव शांत असल्याने ते आंदोलन करतील असे वाटले नव्हते. मात्र माणिकरावांनी कुणालाही कळू न देता, मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविला. त्यांनी शेतकरी आत्महत्येची पहिली मदत जोशी यांच्याच कडून जाहीर करून घेतल्याचेही पुरके यांनी सांगितले. डेहनी उपसा सिंचन योजनेसह अनेक विकासाची कामे त्यांनी केल्याचेही यावेळी पुरके यांनी स्पष्ट केले.

… तर माणिकराव दोन वेळा मुख्यमंत्री असते : मोघे

माणिकराव ठाकरे सरकारमध्ये कमी, पक्षसंघटनेत अधिक राहिले. त्यांच्यासारखे नेतृत्व पश्‍चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यात असते तर, आतापर्यंत माणिकराव दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले असते, असे माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे म्हणाले. विदर्भाचे दुर्दैव आहे. इथे विकासाचा अभ्यास असलेल्या नेतृत्वाला संधी मिळत नाही. त्यामुळे माणिकराव तुम्ही संयमीपणा सोडून अग्रेसिव व्हा, असा सल्लाही मोघे यांनी दिला. माणिकराव प्रचंड संयमी आहेत. जे संयमी असतात तेच राजकारणात टिकतात. माणिकरावांना शिव्या दिल्या तरी, ते काहीही बोलत नाहीत. मात्र, त्यात त्यांचा कमीपणा नसून ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पालन करतात. सात वर्ष युवक काँग्रेसचे व सात वर्ष जेष्ठ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिले. हल्ली दोन वर्ष कुणाला पद टिकविता येत नाही असेही मोघे म्हणाले.

स्व. उत्तमराव दादांनी आम्हाला लिडरशिप दिली

राजकारणात आम्ही सारेच माजी खा. स्व. उत्तमराव पाटील यांच्यामुळे जीवंत आहोत. माझ्यासह सर्वांना त्यांनी जिल्ह्यात लिडरशिप दिली असे उद्गारही माजी मंत्री मोघे यांनी काढले.

यांचाही झाला गौरव

‘जनसेवेचा माझा प्रवास’ हे पुस्तक लेखनासाठी अक्षर जुळवणीसह मुद्रितशोधन, मुखपृष्ठ व इतर सहाय्य जीव झोकून करणाऱ्या कवी हेमंत कांबळे, मुद्रितशोधक विजयकुमार गाडगे, रविंद्र तिवारी, बाबा मिर्झा, चित्रकार बळी खैरे यांचाही या कार्यक्रमात यथोचित शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'लाडकी बहीण' विरोधात काँग्रेस कार्यकर्त्याची याचिका काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा पुन्हा उघड - भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा घणाघात

Fri Aug 30 , 2024
मुंबई :- लाडकी बहीण योजनेला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांकडून जाणूनबुजून योजनेच्या विरोधात मोहीम सुरू आहे. योजनेचे यश डोळ्यात खुपत असल्याने काँग्रेस नेते सुनील केदार यांचा कार्यकर्ता असलेल्या अनिल वडपल्लीवार याने लाडकी बहिण योजने विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वडपल्लीवार यांच्या मार्फत काँग्रेस आणि महाविकास आघाडी, लाडकी बहिण योजनेविरोधातील त्यांचा अजेंडा राबवत आहे असा घणाघात भारतीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com