नैसर्गिक शेती रोखू शकते शेतकरी आत्महत्या! – गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना विश्वास

– ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ‘नैसर्गिक शेती’चे प्रकाशन 

नागपूर :- उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी हे समीकरण शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक आहे. रासायनिक शेतीमुळे जमिनीचे नुकसान झाले आणि पर्यायाने शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे कमी खर्चातून जास्त उत्पादन देणारी नैसर्गिक शेती अधिक उपयुक्त आहे. शेतकरी आत्महत्येसारख्या गंभीर प्रश्नाने ग्रासलेल्या विदर्भात तर जास्तीत जास्त प्रमाणात नैसर्गिक शेतीचा अवलंब करायला हवा. नैसर्गिक शेतीमध्ये आत्महत्या रोखण्याची क्षमता आहे, असा विश्वास गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला.

अॅग्रोव्हिजन फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत आयोजित या कार्यक्रमात ‘नैसर्गिक शेती’ या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन झाले. आचार्य देवव्रत यांनी लिहिलेल्या ‘प्राकृतिक कृषि’ या हिंदी आणि ‘नॅचरल फार्मिंग’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘नैसर्गिक शेती’ या पुस्तकाच्या स्वरूपात करण्यात आला. त्यासाठी ना. गडकरी यांनी पुढाकार घेतला.

सिव्हिल लाईन्स येथील स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, गुजरात येथील प्राकृतिक कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सी. के. तिंबडिया, अॅग्रोव्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष रवी बोरटकर, कोषाध्‍यक्ष रमेश मानकर, सुधीर दिवे, शिरीष भगत, आनंद राऊत आदींची उपस्‍थ‍िती होती. आचार्य देवव्रत म्हणाले, ‘रासायनिक शेती हे शेतकऱ्यांवर लादलेले षडयंत्र आहे. युरिया, डीएपीसारख्‍या रसायनांमुळे शेतीचा खर्च वाढत आहे. जमिनीतील अॉर्गॅनिक कार्बनचे प्रमाण वाढत नाही, तर कमी होत आहे. रासायनिक शेती फक्त खर्च वाढवत आहे.’

जैविक शेती आणि नैसर्गिक शेती यातील फरक समजावून सांगताना आचार्य देवव्रत यांनी स्‍वत: केलेल्‍या विविध प्रयोगांचेही उदाहरण दिले. देशी गायीचे शेण आणि गोमूत्राचा वापर केल्‍यास जमिनीची पत सुधारते, ती सुपीक होते आणि चांगले उत्‍पादन देऊ लागते, असे ते म्हणाले.

‘वाडवडिलांकडून मिळालेल्‍या उपजाऊ शेतीमध्‍ये युरिया, डीएपी, किटकनाशकांचा अंधाधुंद वापर केल्‍यामुळे जमीन नापीक झाली आहे. आजारांचे प्रमाण वाढले आहे. शेतीला पुन्हा एकदा सुपीक करायचे असेल आणि कमी खर्चात अधिक उत्‍पादन, अधिक नफा प्राप्‍त करायचा असेल तर नैसर्गिक शेतीचा मार्ग निवडावा,’ असे आवाहन आचार्य देवव्रत यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी त्यांनी गुजरातमध्ये १० लाख शेतकरी नैसर्गिक शेती करीत असल्याची माहिती दिली. रवी बोरटकर यांनी शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या निमित्ताने अॅग्रोव्हिजनच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेल्याचे प्रास्ताविकात सांगितले. सूत्रसंचालन आसावरी देशपांडे यांनी केले.

गडकरी ‘व्हिजनरी लिडर’ – आचार्य देवव्रत

नितीन गडकरी हे एक व्हिजनरी लिडर आहेत. ते एकदा एखादी गोष्ट बोलतात तर ती करूनही दाखवतात. त्यांच्या मनात शेतकऱ्यांप्रति सन्मानाची भावना आहे. त्यामुळेच ते शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करीत असतात. काम करणे आणि काम करून घेणे या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी काढले.

शेतकरी समृद्ध व्हावा हाच उद्देश – ना. गडकरी

शेतीचा खर्च कमी झाला आणि उत्‍पादनात वाढ झाली तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. शेतकरी कर्जमुक्‍त झाला तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कुठल्याही दडपणाशिवाय भागवू शकेल. त्यामुळेच नैसर्गिक शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. विदर्भातील शेतकरी समृद्ध व्हावा, हा आपल्या अशा उपक्रमांचा एकमेव उद्देश आहे, असे प्रतिपादन श्री. गडकरी यांनी केले. ‘बीज व रोपट्यांची चांगली नर्सरी असणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्‍साहन देणे गरजेचे आहे. अॅग्रोव्हिजन फाउंडेशनच्या वतीने आवर्जून यावर भर दिला जाणार आहे. त्यादृष्टीने ‘नैसर्गिक शेती’ हे पुस्‍तक विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असेल,’ असेही ना. गडकरी म्हणाले.

शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन

अॅग्रोव्हिजन फाउंडेशनच्या वतीने वर्धा मार्गावर उभारण्यात येणाऱ्या शेतकरी प्रशिक्षण केंद्राचेही भूमिपूजन राज्यपाल आचार्य देवव्रत व ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. याठिकाणी प्रशिक्षणासोबतच माती, पाणी परीक्षणाची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. नैसर्गिक शेतीत तयार झालेली उत्‍पादने, फळे शेतकरी थेट ग्राहकांना विकू शकतील, असे मार्केट उभारले जाणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

"ऋतु हिरवा ऋतु बरवा" कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

Mon Aug 26 , 2024
नागपूर :-गांधीनगर शारदा महिला मंडळातर्फे श्रावणाच्या निमित्ताने ऋतु हिरवा ऋतु बरवा या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले,या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नाटय कलावंत राजेश चिटणीस, माजी महापौर कुंदा मसुरकर, माजी नगरसेविका विनया फडणवीस, माजी नगरसेविका परिणीता फुके होते. या कार्यक्रमात महिलांसाठी भरपुर स्पध्रेचे आयोजन करण्यात आले,पाहुण्यांचं स्वागत पुष्पा शिवणकर, विणा वडेट्टीवार, स्मिता केदार यांनी केलं, स्पध्रेत चे विजेते आहे मनिषा संतोषवार, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com