– लोकसेवा हक्क कामकाजाचा आढावा
यवतमाळ :- अमरावती विभागाचे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त डॅा.एन.रामबाबू यांनी सेवा हमी कायद्यांतर्गत जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या सेवांचा आढावा घेतला. सर्वसामान्यांना वेळेत सेवा मिळाव्यात यासाठी शासनाने कायदा केला आहे. त्यामुळे कमी त्रासात, पारदर्शपणे सेवा मिळणे आवश्यक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीला जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, महाआयटीचे फिरोज पठान यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते. लोकसेवा हमी कायद्यांतर्गत अधिसूचित सेवा ठरवून दिलेल्या विहीत कालावधीत मिळणे आवश्यक आहे. विभागांनी आपल्या अधिपत्याकाली येत असलेल्या सेवा कालमर्यादेत अधिक नागरिकांना कमीतकमी त्रासात उपलब्ध होतील, याची दक्षता घ्यावी.
गेल्या वर्षी या कायद्यांतर्गत सेवा पुरविण्याचे प्रमाण 84 टक्के ईतके होते. यावर्षी जिल्ह्याचे काम 99 टक्के ईतके आहे. याबाबत आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाचे कौतूक केले. सेवा पुरवितांना काही अडचणी असल्यास विभागांनी जिल्हाधिकाऱ्यांची मदत घ्यावी किंवा लोकसेवा हक्क आयुक्तालय सुद्धा विभागांना समस्या निकाली काढण्यासाठी मदत करून शकेल, त्यामुळे मोकळेपणाने आपल्या समस्या असल्यास त्या देखील सांगाव्या असे डॅा.रामबाबू म्हणाले.
यावेळी त्यांनी विभागनिहाय पुरविण्यात येत असलेल्या सेवा व प्रगतीचा आढावा घेतला. ज्या विभागांचे काम चांगले आहे, त्यांचे कौतूक केले तर कमी काम असलेल्या विभागांना गती वाढविण्याचे निर्देश दिले. बैठकीनंतर आयुक्तांनी यवतमाळ शहरात नव्याने तयार करण्यात येत असलेल्या आदर्श आपले सरकार सेवा केंद्राच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर काही कार्यालयांना भेटी देऊन तपासणी व पुरविण्यात येत असलेल्या सेवांचा आढावा घेतला.