– हर घर तिरंगा अंतर्गत मनपाचे विविध उपक्रम
चंद्रपूर :- हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता बाईक रॅलीचे आयोजन प्रियदर्शिनी चौक येथे करण्यात आले असून यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शासन निर्देशानुसार ०९ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशव्यापी ‘घरोघरी तिरंगा ’ मोहीम राबवण्यात येणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा अभियानाचा उद्देश आहे. ७७ वा स्वातंत्र्य दिन घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा केला जाणार आहे. यात विविध उपक्रम चंद्रपूर मनपातर्फे घेतल्या जात असुन १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील सर्व महाविद्यालये, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, शासकीय कार्यालये यांना पत्र देऊन रॅलीत सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले असल्याने विद्यार्थी,शासकीय कर्मचारी,राजकीय पक्ष,मनपा अधिकारी – कर्मचारी व इतरांचा प्रतिसाद मिळून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग होण्याची शक्यता आहे. बाईक रॅली असल्याने हेल्मेट घालणे अनिवार्य असल्याच्या सुचना सर्वांना देण्यात आल्या आहेत.
प्रियदर्शिनी चौक ते वरोरा नाका ते सावरकर चौक ते बंगाली कॅम्प ते परत सावरकर चौक ते प्रियदर्शिनी चौक ते जटपुरा गेट ते अंकलेश्वर गेट ते बागला चौक ते अंचलेश्वर गेट असा रॅलीचा मार्ग असुन मनपा कार्यालय गांधी चौक येथे रॅलीची सांगता होणार आहे.
त्याचप्रमाणे १४ ऑगस्ट रोजी देशभक्तीवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शिनी सभागृह येथे करण्यात आले असुन मनपा अधिकारी कर्मचारी व व्यावसायिक कलाकार यात सहभागी होणार आहेत.स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या आप्तजनांना या कार्यक्रमांत सन्मानित करण्यात येणार आहे. हर घर तिरंगा अभियान सर्वांचे असल्याने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावरती तिरंगा फडकविण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.