गडचिरोली : सहाही विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला आघाडी, भाजप आमदारांच्या सुमार कामगिरीची सर्वत्र चर्चा

– दोनवेळा मोदी लाटेत निवडणून आलेले भाजपचे अशोक नेते यांचा काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांनी तब्बल १ लाख ४१ हजार ६९६ मतांनी दारुण पराभव केला

गडचिरोली :- दोनवेळा मोदी लाटेत निवडणून आलेले भाजपचे अशोक नेते यांचा काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांनी तब्बल १ लाख ४१ हजार ६९६ मतांनी दारुण पराभव केला. पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या किरसान यांच्या विजयाने जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली असून मोठ्या विजयाचा दावा करणाऱ्या भजपाच्या नेत्यांना स्वतःच्या विधानसभा क्षेत्रात आघाडी देता न आल्याने पराभवाची नामुष्की ओढवली, अशी भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांनावर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या काही आमदारांची जागा धोक्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भाजपाकडून दोन वेळ आमदार आणि खासदार राहिलेल्या अशोक नेते यांच्या उमेदवारीला यंदा संघ आणि भाजपाच्या काही नेत्यांचा विरोध होता. त्यामुळे उमेदवार बदलाची चर्चा होती. अगदी शेवटच्या क्षणाला नेतेंना उमेदवारी देण्यात आली. २०१४ आणि २०१९ मध्ये मोदी लाटेत विजयश्री प्राप्त करणाऱ्या नेतेंना या कार्यकाळात स्वतःचे वेगळे राजकीय अस्तित्व निर्माण करता आले नाही. त्यामुळेच याहीवेळी मोदींच्या भरवशावर ते रिंगणात उतरले होते. परंतु त्यांना पराभव पत्करवा लागला.

गडचिरोली-चिमूर लोकसभेत त्यांच्या विरोधात असलेल्या वातावरणाचा काँग्रेसच्या विजयात मोठा वाटा आहे. सोबत नवनियुक्त खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी मागील दहा वर्षांपासून घेतलेली मेहनत फळाला आली. या लोकसभेतील सहाही विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला विजयी आघाडी आहे. त्यापैकी गडचिरोली, चिमूर आणि आरमोरी येथे भाजपचे आमदार आहेत. आमगांव, ब्रम्हपुरी येथे काँग्रेस तर अहेरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार आहेत. विधानसभानिहाय मताधिक्य बघितल्यास भाजपचे बंटी भांगाडिया आमदार असलेल्या चिमूरमधून काँग्रेसला सर्वाधिक ३७ हजार ३६१ मतांची आघाडी आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ.चंदा कोडवते आणि डॉ. नितीन कोडवते यांच्या भाजप प्रवेशात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आमदार बंटी भांगडीयाची खेळी पूर्णपणे अपयशी ठरली.

तर आरमोरी विधानसभेत किरसान यांना ३३ हजार ४२१ इतक्या मतांची आघाडी आहे. या विधानसभेचे प्रतिनिधित्व भाजपचे आमदार कृष्णा गजबे करतात. या विधानसभेचे ‘किंगमेकर’ म्हणून ओळखले जाणारे सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार आणि प्रकाश पोरेड्डीवार यांना देखील भाजपला मताधिक्य मिळवून देण्यात यश आले नाही. गडचिरोली विधानसभेतसुद्धा काँग्रेसला २२ हजार ९९७ मतांची आघाडी आहे. त्यामुळे भाजप आमदार डॉ. देवराव होळी हे देखील टिकेचे धनी ठरत आहे. उलट काँग्रेसचे आमदार असलेल्या ब्रम्हपुरी आणि आमगांव विधानसभेत काँग्रेसला अनुक्रमे २३ हजार ५१४, १० हजार ८६९ इतकी आघाडी होती. तर अहेरी विधानसभेतून काँग्रेसला १२ हजार १५२ इतक्या मतांची आघाडी आहे. याठिकाणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम व भाजपचे माजी मंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. एकंदरीत चित्र बघितल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रचारदरम्यान जीवाचे रान केले पण नेत्यांची निष्क्रियता पराभवाचे कारण ठरले, अशी चर्चा भाजपाच्या गोटात आहे.

Source by loksatta

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विदर्भ, मुंबईत भाजपला का बसला धक्का, समजून घ्या पाच मुद्यांमधून

Wed Jun 5 , 2024
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा विदर्भ आणि मुंबई विभागात चांगलाच फटका बसला. विदर्भातील दहा जागांपैकी महायुतीला तीन जागा मिळाल्या. त्यात बुलढाण्याची जागा शिंदे सेनेची आहे. दुसरीकडे मुंबईतील सहा जागांपैकी दोन जागा भाजपला मिळाल्या. त्यात एका जागेवर शिंदे सेनेचा निसटता पराभव झाला आहे. भाजपचा हा पराभव का झाला? याचे विश्लेषण पक्षाच्या बैठकीत केले जाणार आहे. पाच मुद्यांमधून भाजपच्या पराभवाची कारणे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com