– इतवारी रेल्वे स्थानकावर संशयाच्या आधारे अडकला
नागपूर :- धावत्या रेल्वेत मोबाईल चोरी करणार्या युवकाला आरपीएफच्या पथकाने पकडले. जितेन्द्र हत्तिमारे (25) रा. कामठी रोड, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरपीएफच्या पथकाने संशयाच्या आधारे इतवारी रेल्वे स्थानकावर ही कारवाई केली.
रेल्वेत प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. याच संधीचा फायदा घेत भुरटे चोरी प्रवाशांचे मोबाईल पळवितात. गाडीत चढताना किंवा उतरताना प्रवाशांची झाली की भुरटे चोर सक्रीय होतात. तसेच चार्जिगवर असलेला मोबाईलही पळवितात. अशा अनेक घटना उघडकीस आल्या. चोरी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या आदेशानुसार एक पथक तयार करण्यात आले. हे पथक चाल्या गाडीत आणि प्लेटफार्मवर पेट्रोलिंग करीत असतात. रविवार 5 मे रोजी आरपीएफचे पथक फलाट क्रमांक 6 वर पेट्रोलिंग करीत असताना उपरोक्त आरोपी संशयास्पद आढळला. पथकाने घेराबंदी करून त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता 20857 पुरी-साई नगर शिरडी एक्सप्रेसमधून एका प्रवाशाचे दोन मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. त्याच्या जवळून दोन मोबाईल जप्त करण्यात आले. पूरी साईनगर शिरडी एक्सप्रेसने फिर्यादी छाया वनवे ह्या प्रवास करीत होत्या. कोच एस-5 कोचच्या बर्थ 58 वर असताना आरोपीने त्यांचे दोन्ही मोबाईल पळविले. या घटनेची तक्रार त्यांनी तक्रार नोंदविली होती. आरोपीला पुढील कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. ही कारवाई आरपीएफ निरीक्षक एस.ए.राव, सहायक उपनिरीक्षक के. के. निकोड़े, आरक्षक रामफल कुरैती आणि आरक्षक सतीष कुमार यांनी केली.