नागपूर :- शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीत होण्याचे दृष्टीने नागपूर महानगरपालिकेमार्फत विविध चौकांच्या विकासाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. सोमवारी (ता.१) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी विविध चौकांना भेट देउन पाहणी केली.
मनपा आयुक्तांच्या पाहणी दौ-यामध्ये अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, कार्यकारी अभियंता (वाहतूक) रवींद्र बुंधाडे, कार्यकारी अभियंता (विद्युत) राजेंद्र राठोड आदी उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेद्वारे श्रध्दानंदपेठ चौक, गंगाबाई घाट चौक, वर्धमान नगर चौक, छापरु नगर चौक, गांधी पुतळा चौक, सेवा सदन चौक व जापानी गार्डन चौक आदी चौकांची विकासकामे सुरु करण्यात आलेली आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी श्रध्दानंद पेठ चौक तसेच जापानी गार्डन चौक येथे भेट देऊन सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला. श्रद्धानंद पेठ चौकातील पाहणी दरम्यान चौकात सुरळीत व सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने तसेच पादचा-यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.
जापानी गार्डन चौकाच्या पाहणी दरम्यान राजभवन कडून चौकात येणा-या रस्त्यावर होत असलेली वाहतूक कोंडी दूर करण्याकरिता व सदर ठिकाणी अतिमहत्वाच्या व्यक्तींचे होत असलेल्या आवागमनाच्या दृष्टीने तज्ज्ञ वाहतूक सल्लागाराकडून अभिमत घेण्याकरीता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देशीत केले. चौकात असलेले अनावश्यक विद्युत खांब हटविण्याबाबत तसेच सिग्नल पोस्ट सुस्थितीत करण्याबाबत कार्यकारी अभियंता यांना निर्देश दिले.