नागपूर :- 24 मार्च 2024 रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त नागपूर एम्सच्या (AIIMS) फुफ्फुसांच्या आजारांवरील औषध विभागाने एका जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी संचालक आणि एम्स नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. प्रशांत जोशी उपस्थित होते. उपस्थित असलेल्या अन्य मान्यवरांमध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, एम्स नागपूरच्या टीबी केंद्राच्या नोडल अधिकारी डॉ. राजश्री खोत, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मीना मिश्रा, बालरोग विभाग प्रमुख डॉ. मीनाक्षी गिरीश, जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत, पल्मोनरी मेडिसिन विभागाचे डॉ. श्रीकांत मालेगावकर आणि डॉ. पलानीसामी व्ही यांचा समावेश होता.
डॉ. प्रशांत पी. जोशी यांनी क्षयरोगाची जागतिक महामारी, त्याचे उपचार आणि प्रतिबंध या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास तपासणी करण्याची गरज आणि चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर उपचार पूर्ण करणे यावर डॉ. प्रशांत जोशी यांनी भर दिला. 2025 पर्यंत आपल्या देशातून क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांबाबत यावेळी उपस्थित लोकांना जागरूक करण्यात आले. उपस्थितांना, नि:क्षय पोषण योजना आणि नि:क्षय मित्र योजना यासारख्या उपक्रमांबद्दल इतर वक्त्यांनी प्रबोधन केले. क्षयरोग निर्मूलन ही आरोग्य सेवा कर्मचारी, रुग्ण, उपस्थित आणि सामान्य लोकांची सामूहिक जबाबदारी आहे, याची जाणीव यावेळी सर्वांना करून देण्यात आली.
एम्स क्षयरोग केंद्रात उपचार घेतलेल्या रुग्णांचा कार्यकारी संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि यावेळी या रुग्णांनी त्यांचे अनुभव सर्वसामान्यांना सांगितले. रुग्णांच्या सकारात्मक अनुभवांमुळे, कार्यक्रमात एक प्रकारची सकारात्मकता निर्माण झाली. “टीबी हारेगा देश जीतेगा” च्या घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला. नागपूर एम्स टीबी आरोग्य अभ्यागत वंदना यांनी सर्वांचे आभार मानले आणि या वर्षीच्या जागतिक क्षय दिवसाची संकल्पना “Yes, We can End TB” सर्वांनी आपल्या ध्यानीमनी घेत निरोप घेतला.