यवतमाळ :- राज्यामधील महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास संकल्पनेचा अधिकाधिक लाभ युवक-युवतींना व्हावा या दृष्टीकोनातून महाविद्यालयामध्ये महाविद्यालय कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील तीन केंद्राचा समावेश असून या केंद्राचे उद्गाटन नुकतेच झाले.
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ, रामदास आठवले आर्ट सायन्स ज्युनिअर महाविद्यालय चिकणी (डो) ता.नेर, श्री. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मारेगाव या महाविद्यालयामध्ये महाविद्यालय कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी उद्घाटन कार्यक्रमास कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटनप्रसंगी या योजनेचे नाव चाणक्य कौशल्य विकास केंद्र असे घोषित केले. देशाला कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊन आर्थिक प्रगती मध्ये देश हा उच्च स्तरावर पोहचवण्याचे कार्य या विभागामार्फत होत आहे. युवकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
जिल्ह्यातील तिनही महाविद्यालयामध्ये प्लंबर जनरल, इलेक्ट्रीशियन, सेविंग मशीन ऑपरेटर, टू व्हीलर सर्विस टेक्निशियन, मेडिकल सेल्स रिप्रेझेन्टेटीव्ह या कोर्स मध्ये उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी जिल्ह्यातील १९० उमेदवारांनी लाभ घेतला.
उद्घाटन कार्यक्रमानंतर सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय येथील केंद्रावर उमेदवारांना योजनेचा अधिकाधिक संख्येने लाभ घ्यावा, या कोर्समुळे आपले करियर घडविण्यास मदत होईल, ऑन जॉब ट्रेनिंग करत असतांना आपली दैनंदिनी अद्यावत ठेवावी व या कोर्सकरिता नोंदणी केल्यानंतर नियमित कोर्स करावा. यासाठी ७५ टक्के हजेरी आवश्यक असून कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळणार आहे व याचा जॉब मिळविण्यासाठी मदत होईल याबाबत मार्गदर्शन केले.