Ø अंबाझरी धरणावर नव्याने तीन एस्केप गेट
Ø येत्या 10 मार्चला पुल व रस्त्यांच्या कामांसंदर्भात कार्यादेश
Ø नव्याने चिन्हित 56 अतिक्रमणांपैकी 21 काढली
Ø 66 वृक्षांचे होणार संवर्धन
नागपूर :- अंबाझरी धरणावर पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्याच्यादृष्टीने नव्याने तीन एस्केप गेट उभारण्याचा निर्णय आज घेण्यात आला असून या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. धरणाच्या सांडव्याचा विसर्ग वाहून जाण्यासाठी नवीन पूल बांधकामाकरिता येत्या १० मार्च रोजी कार्यादेश काढण्यात येणार आहे. तसेच, धरण बळकटीकरणासाठी प्रस्तावित वृक्षतोड करतांना ६६ वृक्षांचे संवर्धन करण्यात येणार आहे. मनपातर्फे नव्याने चिन्हित ५६ अतिक्रमणांपैकी २१ काढण्यात आली आहेत. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणाच्या या कामांसह अन्य कामांना गती देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज प्रशासनाला दिल्या.
अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, सदस्य जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता पी.के.पवार, मनपाच्या अधिक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी आदी उपस्थित होते. नागपूर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डिकर ऑनलाईन पद्धतीने या बैठकीस उपस्थित होते.
अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी उच्च स्तरीय समितीच्या निर्देशाद्वारे विविध यंत्रणांनी सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजनांना सुरुवात केली आहे. यानुसार दुसऱ्या टप्प्या अंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. अवकाळी पावसामुळे अंबाझरी धरणातील पाण्याचा नाग नदी व नाल्यांमध्ये होणारा मोठा विसर्ग थांबविण्यासाठी या धारणावर तीन एस्केप गेट बसविण्यावर आज या बैठकीत शिक्का मोर्तब झाला. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिक आणि जलसंपदा विभागाने अभ्यासाअंती 4 x 2.5 मिटर उंचीचे तीन गेट बसविण्याचे सुचविले. या कामाला गतीने पूर्ण करण्याच्या सूचना बिदरी यांनी दिल्या.
अंबाझरी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारा विसर्ग व्यवस्थितरित्या वाहून जाण्यासाठी रस्त्यावरील सद्याचा पूल तोडून नवीन पूल बांधण्याच्या प्रस्तावित कामांच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग येत्या १० मार्च रोजी कार्यादेश काढणार आहे. धरणाच्या सांडव्याच्या खालील बाजुस उर्जाव्यव रचनेचे काम व कटऑफ वॉलचे बांधकामही करण्यात येणार आहे.
धरणाच्या प्रवाहाला अडथडा निर्माण करणारी १५५ अतिक्रमण काढण्यात आली आहेत. नव्याने या ठिकाणची ५६ अतिक्रमण चिन्हित करण्यात आली असून यातील २१ काढण्यात आली आहेत. उर्वरित अतिक्रमण काढण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
धरणाच्या दुरुस्ती, डागडुजी व पुनर्बांधणीची कामे सुरु आहेत. यासाठी तज्ज्ञ समितीकडून चिन्हीत करण्यात आलेली या परिसरातील छोटी झाडे तोडणे व पाण्याचा उपसा मनपाद्वारे करण्यात येत आहे. वृक्षतोड सुरु असून चिन्हित वृक्षांपैकी ६६ वृक्षांचे संवर्धन करण्यात येणार आहे. यातील २९ वृक्ष हे वारसा श्रेणीतील असून ३७ वृक्षांच्या बुंध्याचा आकार १६ सेंटीमिटर पेक्षा जास्त आहे. धरणातून दिवसाला २ लाख लिटर पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. येत्या १ एप्रिल रोजी जलसंपदा आणि मनपाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाणी उपसा वाढविणे किंवा कमी करण्या संदर्भात पाहणी करावी, असे निर्देश बिदरी यांनी दिले.
नासुप्रचा स्केटिंग रिंग पार्किंग स्लॅब काढून टाकण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. क्रेझीकॅसल येथून वाहणाऱ्या नाग नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी जलसंपदा विभाग सर्वेक्षण करीत आहेत. या सर्वेक्षणात मेट्रो आणि नासुप्रच्या अभियंत्यांनी सहभागी होऊन येत्या 15 मार्च पर्यंत सर्वे पूर्ण करण्याच्या सूचना बिदरी यांनी दिल्या.