नागपूर :- सरकारी सेवेत रुजू झालेल्या तरुणांनी समाज जीवनात बदल घडविण्याचा उद्देश ठेवावा आणि जात-पात-धर्माच्या पलीकडे जाऊन जनतेची सेवा करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांना केले.
केंद्र सरकारच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याअंतर्गत विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या देशभरातील १ लाखांहून अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले. देशभरात ४७ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. नागपुरात सीआरपीएफ कॅम्पच्या मेन्स क्लब हॉलमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला.
यावेळी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते तरुणांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये महसूल विभाग, गृह मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग, अणु ऊर्जा विभाग, संरक्षण मंत्रालय, आर्थिक सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय यासारखी विविध सरकारी मंत्रालये तसेच विभागांचा समावेश आहे. ना. गडकरी म्हणाले, ‘सरकारी नोकरीच्या माध्यमातून एका नव्या क्षेत्रात तरुणांचे पाऊल पडले आहे. ही एक उत्तम संधी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सरकारी सेवेला ‘कर्मयोगी’ म्हणून स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. कारण तुम्हाला समाजाच्या कल्याणाचे कार्य करायचे आहे. गाव, गरीब आणि शेतकऱ्यांचे जीवन कसे सुसह्य होईल, यासाठी आपल्या नोकरीच्या माध्यमातून प्रयत्न करायचे आहेत.’ यावेळी डीआयजी लोकेंद्र सिंह, जी.डी. पंढरीनाथ यांच्यासह सीआरपीएफ अधिकाऱ्यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.