भाजपा नेते राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांचे वडील सुखदेवराव रामभाऊ बोंडे यांचे शनिवारी (ता.३) वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. महानगरपालिकेच्या शाळेवर अध्यापनाचे कार्य करत ते मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. आयुष्यभर अविरत संघर्ष करून त्यांनी मुलांना चांगले शिक्षण दिले. संस्कारक्षम बनवले. चारही मुलांनी विविध क्षेत्रात सर्वोच्च यश गाठले यासह प्रगतशील समाज निर्मिती व्हावी यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या निधनाच्या निमित्ताने एका कर्मयोगी पर्वाची प्राणज्योत मालवली.
सुखदेवराव रामभाऊ बोंडे भातकुली तालुक्यातील साउर येथील. शिक्षणाच्या व नोकारीच्या निमित्ताने ते अमरावतीत स्थलांतरीत झाले. अमरावतीत आल्यावर त्यांच्या वाटेला नियतीने फार मोठा संघर्ष आणून ठेवला. अतिशय जिद्द, चिकाटीच्या जोरावर संघर्षमय स्थितीत त्यांनी महानगरपालिकेच्या शाळेवर अध्यापनाचे कार्य केले. त्याकाळात साऊर येथे मोठे प्रस्थ असलेले बापूराव बोंडे यांनी त्यांना त्याकरिता मोलाची मदत केली. राजापेठ परिसरातील केडिया नगरात महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या निवासस्थानात ते राहत होते. त्यापूर्वी त्यांनी भाड्याच्या खोलीतही दिवस काढले. स्वभावाने शांत संयमी व्यक्तिमत्व असलेले सुखदेवराव बोंडे हे कायम निरीक्षकाच्या भूमिकेत असायचे. प्रवासासाठी सायकलचा वापर करायचे. अगदीच घरी दुचाकी व चार चाकी वाहनांची रेलचेल असताना देखील त्यांनी सायकलची साथ कधी सोडली नाही. त्यांना आयुष्याच्या पूर्वार्धात फार मोठा संघर्ष करावा लागला तर शेवटच्या क्षणी मुलांचे यशही बघण्याची संधी मिळाली.
भाड्याच्या घरात राहून त्यांनी दोन मुलं व दोन मुली यांना उच्चशिक्षित केले. त्यांचा प्रथम मुलगा डॉ. अनिल बोंडे हे महाराष्ट्राचे कृषिमंत्री होते. राज्यसभेचे खासदार देखील आहेत. राजकारणात त्यांनी सर्वोच्च स्थान गाठले. तर दुसरा मुलगा सुनील बोंडे हे नवी मुंबई येथे पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. कन्या संगीता शिंदे शिक्षण संघर्ष संघटनेचे अध्यक्ष आहेत. शिक्षकांसाठी त्यांनी मोठे काम उभारले आहे. दुसऱ्या कन्या माधुरी मेटांगे या ठाणे येथे राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. चौघांनीही त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च असे यश गाठले आहे. चारही मुलं उत्तम वकृत्वपटू आहेत. व्यक्तिमत्व विकासाची संपूर्ण गुण त्यांच्या स्वभावात अंतर्भूत आहेत. या चौघांच्याही यशामागे सुखदेवराव बोंडे व आई त्रिवेणी बोंडे यांच्या महत्त्वाचा वाटा आहे. आई-वडिलांच्या संस्कारशील शिकवणुकीमुळेच चारही जण आपापल्या क्षेत्रात मोठे नाव करू शकले. गत काही दिवसांपासून सुखदेवराव बोंडे हे वृद्धपकाळामुळे आजारी होते. या काळात चारही मुले व स्नूषा डॉ. वसुधा बोंडे यांनी त्यांची सेवा केली. सुखदेवराव बोंडे यांच्या शिकवणुकीतून तयार झालेल्या चारही मुलांनी कायम समाजभान जपले त्यामागे कर्मयोगी सुखदेवराव बोंडे यांची भक्कम प्रेरणा होती. त्यांच्या निधनाच्या निमित्ताने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्षाशी दोन हात करणाऱ्या एका कर्मयोगी पर्वाची प्राणज्योत मालवली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो, ओम शांती..
– शुभम बायस्कार, अमरावती