· महासंस्कृती महोत्सवात लेझर शो, मशाल यात्रा,गीत गायन व आतीषबाजीने वेधले लक्ष
· आज विख्यात गायक कैलास खेर यांचे सादरीकरण
नागपूर :- रामटेक येथे प्रभू श्रीराम यांच्या वास्तव्याचे महात्म्य व रामटेकची ऐतिहासिक व पौराणिक महती, सिंधुरागिरी महानाट्यातून महासंस्कृती महोत्सवाच्या चौथ्या दिवशी आज सादर करण्यात आली. रामटेकचा इतिहास सांगणाऱ्या या महानाट्याचा हजारो लोकांनी आनंद घेतला.
रामटेक येथील नेहरू मैदानावर सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाच्या चौथ्या दिवशी लेझर शो, रंगबिरंगी आतीषबाजी, मशाल यात्रा, स्थानिक कलावंताद्वारे गीत गायन व आजचे विशेष आकर्षण असलेले सिंधुरागिरी महानाट्य सादर करण्यात आले.
आमदार चंद्रशेखर बावनकुळे,आमदार ॲड.आशिष जयस्वाल, रामटेकच्या उप विभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी आदी उपस्थित होते.
रामटेकच्या पौराणिक इतिहासाची महिमा सांगणाऱ्या या महानाट्याची संकल्पना आ. ॲड.आशिष जयस्वाल यांची असून लेखन अमन कबीर यांचे तर रवींद्र दुरुगकर यांचे दिग्दर्शन, ध्वनी व्यवस्था चारू जिचकार व पुष्कर देशमुख यांचे संगीत आहे. नेपथ्य नाना मिसाळ व सतिश काळबांडे यांचे होते.
पद्मपुराणापासून तर भोसलेकालीन लढाया, नृसिंह अवतार, रामाच्या वनवासाचा कालखंड आदी प्रसंग यात उभे करण्यात आले आहेत. सिंधुरागिरी पर्वताचे महात्म्य यात वर्णन करण्यात आले.
रामटेकचा परिसरातील मौर्य शासकांचा कार्यकाल, सातवाहनांच्या काळ, वाकाटकांनी केलेली सत्ता काबीज, महाकवी कालिदासांचे ‘मेघदूत’, वाकाटककालिन नगरधनचा किल्ला आदी रामटेकशी संबंधित ऐतिहासिक प्रसंग या महानाट्यातून सादर करण्यात आले.
हे नाट्य नागपूर व रामटेकच्या सुमारे 70 कलाकारांनी सादर केले. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या महानाट्याला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने राज्यातील सुरू असलेल्या 19 ते 23 जानेवारी या काळातील महासंस्कृती महोत्सवाचा उद्या समारोप होणार आहे. उद्या शेवटच्या दिवशी सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांचे सादरीकरण होणार असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रवेश मोफत असून प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार असून बरोबर सात वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.