– स्थानिक खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळविणे हाच महोत्सवाचा उद्देश : ना. नितीन गडकरी
– केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांच्या हस्ते सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवाचा थाटात शुभारंभ
नागपूर :- नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाद्वारे हजारोंच्या संख्येत खेळाडू विविध खेळांच्या माध्यमातून आपली प्रतिभा दर्शवितात, अशा प्रतिभावंत खेळाडूंना थेट राष्ट्रीय स्थरावर पोहोचविण्यासाठी खेळाडूंची निवड व त्यांना प्रशिक्षण प्रदान करण्याकरिता राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्था अर्थात “साई’ चे विशेष शिबीर खासदार क्रीडा मोहोत्सावादरम्यान घेण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी केली.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती व प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते व खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी (ता.12) शहरातील यशवंत स्टेडियमवर खासदार महोत्सवाच्या सहाव्या पर्वाचा शुभारंभ झाला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जी.टी.सी.सी. अध्यक्ष, कॉउंसिल मेंबर आय,ओ.ए. अमिताभ शर्मा, आमदार सर्वश्री प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव जितेंद्र ठाकूर, बंटी कुकडे, सुधीर दिवे, रमेश भंडारी, डॉ. पियुष आंबुलकर, डॉ. संभाजी भोसले यांच्यासह इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करीत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती व प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणले की,खासदार क्रीडा महोत्सवातील उत्साह बघून विकसित भारत ही संकल्पना २५ वर्षात नक्कीच पूर्ण होणार असल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतने क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पदक भारतीय खेळाडूंनी जिंकत आपली ताकद दाखविली आहे. पुढील काही वर्षात भारत ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करणार आहे. त्याकरिता खासदार क्रीडा महोत्सवासारख्या क्रीडा महोत्सवाना आयोजित करून प्रतिभावंत आणि उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्याची गरज आहे. “साई” अशाच उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यासाठी विशेष शिबीर घेण्यात येणार आहे. नागपूरच्या ओजस देवतळे सारखे आणखी खेळाडू या माध्यामतून नक्कीच पुढे येतील असा विश्वाश ठाकूर यांनी व्यक्त केला.
याशिवाय येत्या दोन महिन्यात म्हणजेच ३१ मार्च पर्यंत आपण देशभरामध्ये खेलो इंडिया योजनेअंतर्गत एक हजार खेलो इंडिया केंद्राची स्थापना करणार असून या खेलो इंडिया केंद्राच्या संचालनाची जबाबदारी जे चॅम्पियन ऍथलेट आहेत त्या माजी खेळाडूंना देण्यात येईल अशी घोषणा देखील श्री ठाकूर यांनी केली. तसेच मल्लखांब सारख्या देशी खेळांना देखील आंतरराष्ट्रीय पटलावर घेऊन जाण्याचा मानस असल्याचेही ठाकूर यांनी बोलून दाखविले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहराचा सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात विकास करण्याच्या हेतूने खासदार क्रीडा महोत्सवाची संकल्पना पुढे आली. आपल्याकडे प्रतिभेची कमी नाही. या प्रतिभावंतांना प्रोत्साहन देऊन त्यांना खेळण्याची संधी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास पुढे देशाचे नावलौकीक करणारे अनेक खेळाडू पुढे येतील. आपल्या शहरातील खेळाडूंनी देशाचे नाव लौकिक करणे यातच खासदार क्रीडा महोत्सवाचा उद्देश साध्य आहे, असे प्रतिपादन केले.
पुढे बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनासाठी सहकार्य करणारे महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वातील संपूर्ण चमू, क्रीडा संघटक, प्रशिक्षक, खेळाडू यांचे अभिनंदन केले. सर्वांच्या सहकार्याने शांतीपूर्णरित्या देशातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव यशस्वी होत असल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.
प्रास्ताविकात खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी याप्रसंगी महोत्सवाच्या मागील पाच वर्षातील वाटचालीत झालेल्या बदलांची माहिती दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून 2018 साली पहिल्यांदा खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात फारशी माहिती नसतानाही यशस्वीरीत्या तो पार पडला. पण पुढील काळात महोत्सवाचे आयोजन करताना जुन्या अनुभवातून शिकत नवनवे बदल करता आले. विविध खेळांचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 2018 चा पहिला खासदार क्रीडा महोत्सव 20 दिवसांचा होता. यात 30 क्रीडांगणांवर 20 खेळ, 292 स्पर्धा, 540 चमू, 880 प्रशिक्षक, 1500 ऑफिशियल्स आणि 25 हजार खेळाडूंचा समावेश होता. या क्रीडा महोत्सवात 43 लक्ष 80 हजार 200 रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. तर मागील वर्षी 2022 साली झालेल्या पाचव्या खासदार महोत्सवात 15 दिवसांत 49 क्रीडांगणांवर 35 खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यात 2280 चमूंनी सहभाग घेतला. 5000 ऑफिशियल्स आणि 54 हजार खेळाडूंचा सहभाग होता. महोत्सवात 1 कोटी 30 लक्ष 87 हजार रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी मशाल प्रज्वलित करून महोत्सवाचा शुभारंभ केला. गोवा येथील ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धातील पदक विजेते छकुली सेलोकर, सबक्षी योबितकर, पार्थ दिबरकर, शुभम वंजारी यांनी मान्यवरांना मशाल सुपूर्द केली. अर्जुन व द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त विजय मुनेश्वर यांनी खासदार क्रीडा महोत्सवाचे ध्वजारोहण केले. नंतर महोत्सवातील सर्व स्पर्धांच्या पथकाने पथसंचलनातून मान्यवरांना मानवंदना दिली. हंबीरराव मोहिते यांनी पथसंचलनाचे सूत्रसंचालन केले. अगदी शिस्तबद्धरित्या खेळाडूंनी पथसंचलन केले. विशेष म्हणजे, दिव्यांग खेळाडूंच्या पथसंचालनाला उपस्थित मान्यवर आणि उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून प्रोत्साहन दिले.
तत्पूर्वी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांचे स्वागत केले. यावेळी नव युवक प्राथमिक शाळा राजाबक्षा येथील शिव नवयुग ढोल ताशा व ध्वज पथकाने ढोल-ताशा सादर केले. नंतर स्व. अमित नखाते ग्रुप कडून योगा डान्सचे सादरीकरण केले. तर केशवनगर माध्यमिक शाळाच्या विद्यार्थांनी लेझीमचे थरारक प्रात्यक्षिक सादर केले. तसेच खासदार क्रीडा महोत्सवाची पाच वर्षाची वाटचाल दर्शविणारी चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी खेळाडूंना शपथ दिली.
नागपुरातील खेळाडूंसाठी महत्वाचे व्यासपीठ ठरलेले हे खासदार क्रीडा महोत्सव 8 ते 22 जानेवारी 2022 पर्यंत चालेल. शहरातील वेगवेगळ्या भागांमधील 63 मैदान अथवा क्रीडा स्थळी तब्बल 55 खेळ खासदार क्रीडा महोत्सवात खेळले जातील. विशेष म्हणजे, यंदाच्या महोत्सवात विदर्भस्तरीय स्पर्धा सुद्धा घेण्याचा निर्णय खासदार क्रीडा महोत्सव समितीद्वारे घेण्यात आलेला आहे. विविध 55 खेळांमध्ये विदर्भस्तरावर 5 स्पर्धा आणि महाराष्ट्र स्तरावर 1 स्पर्धा घेण्यात येणार आहे. विदर्भस्तरीय कबड्डी, खो-खो, अथेलेटिक्स, कुस्ती आणि सायकलिंग या पाच स्पर्धा होणार आहेत. तर महाराष्ट्र स्तरावरील आमंत्रित सीनिअर बास्केटबॉल स्पर्धा घेण्यात येईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माय एफएम चे आरजे आमोद यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
*खासदार क्रीडा महोत्सव-6 च्या ठळक बाबी*
17 दिवस
55 क्रीडा प्रकार
65 क्रीडांगण
2,325 संघ
4,800 ऑफिशियल्स
65,000 सहभागी खेळाडू
12,500 सामने
1,100 ट्रॉफी
12,300 मेडल्स
1,35,00,000 रुपये बक्षीस रक्कम
*शुभंकर च्या गाण्यांनी संचारला उत्साह*
खासदार महोत्सवाच्या सहाव्या पर्वाच्या शुभारंभ प्रसंगी गायक शुभंकर यांच्या गाण्यांनी यशवंत स्टेडियम मध्ये उपस्थित सर्वांमध्ये उत्साह संचारला. नागपूरच्या गुलाबी थंडीत स्टेडियममध्ये उपस्थित सर्वांनी शुभांकार यांच्या गाण्यांना चांगलीच दाद दिली. वातावरणात चांगला गारवा जाणवत असताना शुभंकरने गायलेल्या गाण्यांनी गर्मी भरली..