संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-विविध कलागुणातून विद्यार्थ्यांचे बहारदार नृत्य, ड्रामाचे सादरीकरण
कामठी :- श्री सदाशिवराव शिक्षण संस्था द्वारे संचालित स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे शनिवार ला वार्षिक स्नेहसम्मेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकाद्दे, उपाध्यक्षा कुंदा राऊत, पंचायत समितीच्या सभापती दिशा चनकापुरे, संस्थेच्या अध्यक्षा किशोरी भोयर, उपाध्यक्षा अनुराधा भोयर, संस्थेचे सचिव सुरेश भोयर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद उमेकर , बी पी एड कॉलेज चे प्राचार्य डॉ दिलीप कोहले, बी एड कॉलेजच्या प्राचार्या डॉ. रुपाली पाटील, तंत्रविद्यानिकेतन कॉलेज चे प्राचार्य एम बी घोलसे आदी उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन केले. यावेळी उपस्थित पाहुण्यांचे स्मृती चिन्ह, शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना प्रमुख पाहुण्यांनी एक सुरात म्हंटले की, शैक्षणिक गुणवत्तेसह विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अविरत अग्रेसर असणाऱ्या स्वामी अवधेशानंद सारख्या शाळेत तुमचा मुलगा शिकतो म्हणजे त्याच्या भवितव्याबाबत निश्चित रहा व आपल्या पाल्याची इतर पाल्यासोबत तुलना करू नका तसेच शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले असेल तरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल, असे सांगितले. त्यांनी शाळेचे संस्थापक स्व. माजी आमदार यादवराव भोयर यांनी या शिक्षण संस्थेच्या भरारी साठी केलेल्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा करून त्यांना अभिवादन केले. तसेच त्यांचा हा वारसा पुढे नेत संस्थेच्या अध्यक्षा किशोरी भोयर, सचिव सुरेश भोयर, उपाध्यक्षा अनुराधा भोयर यांनी शाळेच्या विकासात भर घातली असल्याचे सांगितले. शाळेच्या प्रगतीत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या शाळेच्या प्राचार्या डॉ. ईशा मुदलीयार यांचे सुद्धा मुक्तकंठाने प्रशंसा करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, प्रबोधनपर तसेच चित्रपटाच्या गीतांचे सादरीकरण केले.
सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या अंगीकृत असलेल्या विविध कलागुणातून एकापेक्षा एक सरस व बहारदार नृत्य, ड्रामा, सादरीकरण करून प्रेक्षक व उपस्थित पालकांची मने जिंकली. सदर कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व पालक आदींनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या डॉ. ईशा मुदलीयार यांनी केले. यावेळी दहावी व बारावीच्या प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संचालन सुषमा गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार कविता विघे यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता शाळेचे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास पालक व प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.