– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र आदासा येथे सामूहिक पठण
– शेकडो भाविकांच्या गर्दीने बहरला श्री गणेश मंदिराचा परिसर
नागपूर :- श्री क्षेत्र आदासा येथील पुरातन गणेश मंदिराचा निसर्गरम्य परिसर… चहूबाजुंनी भाविकांची गर्दी… आणि आसमंतात निनादणारे अथर्वशीर्षाच्या आवर्तनांचे स्वर… अशा आल्हाददायक वातावरणाचे सारे साक्षीदार ठरले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी व कांचन गडकरी यांच्या उपस्थितीत रविवारी (दि. २९) आदासा येथे झालेले अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण हा एक अनोखा अनुभव असल्याची उत्स्फूर्त भावना भाविकांनी व्यक्त केली.
ना. गडकरी यांच्या संकल्पनेतून अथर्वशीर्षाच्या २१ आवर्तनांचे सामूहिक पठण करण्यात आले. यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार सुनील केदार, बावनकुळे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी आमदार सुधाकर कोहळे, डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार अशोक मानकर, आदासा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष न्या. श्री. राठोड, सचिव जयंत मुलमुले, ॲड. श्रीकांत पांडे, कुंदनवार, ॲड. बानाईत, ॲड. ओझा, मनीषा पिंपळशेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘प्रणम्य शिरसां देवं’ आणि महिषासुरमर्दिनी स्तोत्राने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर शंखनाद झाला आणि अथर्वशीर्ष पठणाला प्रारंभ झाला. वेदशास्त्र देवेश्वर आर्वीकर गुरुजी, सौरभ जोशी, आदित्य साहूरकर आणि कौस्तुभ पेंडके यांनी व्यासपीठावरून मंत्रोच्चार व अथर्वशीर्ष पठणाचे नेतृत्व केले. आवर्तनांचे पठण सुरू असताना संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ना. गडकरी यांचे संपूर्ण कुटुंब यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे नागपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून शेकडो भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.
पहाटेपासून भाविकांची लगबग
आदासा येथे पोहोचण्यासाठी जिल्ह्यातील भाविकांची पहाटेपासून लगबग सुरू होती. बस व खासगी वाहनांच्या माध्यमातून अनेक भाविक सहकुटुंब आदास्यात दाखल झाले. नागपूरच्या विविध भागांमधून पहाटे पाच वाजता आदास्याच्या दिशेने बसेस रवाना झाल्या. त्यामुळे अथर्वशीर्ष पठणाच्या निमित्ताने नागपुरातही पहाटेपासूनच भक्तिमय वातावरणाचा अनुभव आला.
गडकरी कुटुंबीयांनी केली श्री गणेशाची आरती
अथर्वशीर्षाच्या सामूहिक पठणानंतर आदासा येथील श्री गणेश मंदिरात ना. गडकरी यांनी सहकुटुंब आरती केली. यावेळी कांचन गडकरी, मुले निखिल व सारंग, स्नुषा ऋतुजा व मधुरा, नातवंडे नंदिनी, सान्वी, कावेरी, निनाद, अर्जून यांच्यासह रविंद्र व संध्या कासखेडीकर, आदित्य कासखेडीकर यांचीही उपस्थिती होती. आरतीनंतर स्थानिकांनी ना. गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून उपक्रमाबद्दल विशेष आभार मानले.