स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीने घेतला शहरातील स्थितीचा आढावा

– स्वाईन फ्लू टाळण्याकरीता काळजी घ्य

नागपूर  : स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीद्वारे (Death Audit Committee) शुक्रवारी (ता.27) नागपूर शहरातील स्वाईन फ्लूच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीची (Death Audit Committee) बैठक पार पडली.

बैठकीत समितीचे अध्यक्ष मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, समितीचे सदस्य इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) चे सहा.प्राध्यापक डॉ. प्रविण सलामे, सुक्ष्मजिवशास्त्र विभागचे डॉ.रविन्द्र खडसे, बालरोगतज्ञ डॉ.मिलींद सुर्यवंशी, डागा रुग्णालयाच्या स्त्रिरोगतज्ञ डॉ. माधुरी थोरात, मनपाचे स्वाईन फ्लू कार्यक्रम नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांच्यासह इतर उपस्थित होते.

शहरात स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने सुरक्षात्मक काळजी घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. या बैठकीमध्ये नागपूर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये दाखल संशयित स्वाईन फ्लू रुग्ण व त्यातील बाधित या सर्वांचा आढावा घेण्यात आला. समितीसमोर एकूण 1 स्वाईन फ्लू संशयित रुग्णांच्या मृत्यू विषयी माहिती ठेवण्यात आली. त्याचे विश्लेषण केले असता 1 मृत्यू स्वाईन फ्लू मुळे झाल्याचे विश्लेषणातून स्पष्ट झाले. यात नागपूर शहरातील 72 वर्षाचा इसम असून त्यास अनेक सहव्याधी होत्या असल्याचे निष्पन्न झाले.

5 रुग्ण स्वाईन फ्लू मुक्त

नागपूर शहरात 1 जानेवारी 2023 पासून 6 स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी मनपा हद्दीतील 6 रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 रुग्ण स्वाईन फ्लू मुळे मृत्यूमुखी पडला आहे. वर्ष 2022 मध्ये महानगरपालिका हद्दीतील 371 स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद झाली असून, यापैकी 21 रुग्णांचा मृत्यु झाला होता. तर 350 स्वाईन फ्लू रुग्ण औषधोपचाराने सुखरुप घरी पोहचले. ही सुखद बाब असून, वेळीच सतर्कता दाखवून वैद्यकीय उपचार घेतल्यास स्वाईन फ्लू वर मात करणे शक्य आहे.

सर्दी-पडसे, घसा दुखणे, अंगदुखी यासारखे फ्लू सदृष्य लक्षणे दिसून आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेउन त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा. वेळीच औषधोपचार आणि योग्य काळजी घेतल्यास स्वाईन फ्लूवर मात करणे सहज शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करणे टाळावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे.

स्वाईन फ्लू टाळण्याकरीता ही काळजी घ्या

Ø हात सातत्याने साबण व पाण्याने धुवा

Ø गर्दीमध्ये जाणे टाळा

Ø स्वाईन फ्लू रुग्णापासून किमान ६ फूट दूर रहा

Ø खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा

Ø भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी

Ø पौष्टीक आहार घ्या

हे करु नका

Ø हस्तांदोलन अथवा आलिंगन

Ø सार्वजनिक ठिकाणी थुंकणे

Ø डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे

 

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com