– विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे दिले वनाधिकाऱ्यांना निर्देश
नागपूर :- विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यू शून्य करण्यासाठी तात्काळ अभ्यासपूर्ण उपाययोजना करणेबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज प्रधान सचिव, वने व राज्यातील वरिष्ठ वनाधिका-यांना नागपूर येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत निर्देश दिले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध शिकारीचे प्रमाण शुन्यावर आले असले तरी विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यू ही चिंताजनक बाब आहे. यासंदर्भात जनजागृती, कायदेशीर तरतूदी, प्रशिक्षण इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रीत करावे व असे प्रकार होऊ नये यासाठी सर्वांनी नियोजनपुर्वक प्रयत्न करावे असेही निर्देश यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
काल गडचिरोली येथे विजेच्या धक्क्याने एका वाघाचा मृत्यू झाला होता. त्याची गंभीर दखल घेत वनमंत्र्यांनी आज नागपूर येथील एफ.डी.सी.एम. भवन येथे तातडीची बैठक आयोजित केली होती. यावेळी गडचिरोली येथील वाघाच्या मृत्यू संदर्भात वनमंत्र्यांनी तपास करुन तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार वन विभागाने जलद गतीने तपासाची सूत्रे हलवून सर्व आरोपींस अटक करण्यात आली असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी सांगितले.
यावेळी वनमंत्री यांनी वन विकास महामंडळाच्या विविध कामांचा आढावा घेऊन ही कामे जलदगतीने पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीस प्रधान सचिव (वने) वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, वनसंरक्षक गडचिरोली रमेश कुमार इ. अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.