संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यात 77 गावांचा समावेश होत असून या तालुक्यातील काही गावाचा भार नवीन कामठी तर काही गावांचा भार हा मौदा पोलीस स्टेशन हद्दीत येतो.या ग्रामीण भागात पोलिसांचा पाहिजे तसा वचक नसल्यामुळे येथील सफेदपोश नागरिकांच्या दबावाखाली येथील बहुतेक फॉर्म हाऊस तसेच सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे मौजमस्तिचा प्रकार बेभान सुरू आहे त्यातच काही ठिकाणी जुगार अड्डे बिनधास्तपणे सुरू आहेत ज्यामुळे कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात बावण पत्ती जोमात आणि पोलीस कोमात असल्याची चर्चा जोमात असून यासंदर्भात स्थानिक पोलीस स्टेशन च्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नाकावर निंबु ठेचून स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण च्या पथकाने कामठी तालुक्यातील वडोदा गावातील जुगार अड्यावर धाड घालण्यात यशप्राप्त झाल्याची कारवाही काल दिवसाढवळ्या केली तर या धाडीतून ग्रामीण भागात जुगार व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची प्रचीती आहे.
मौदा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी तालुक्यातील वडोदा गावातील मंगल थोटे यांच्या शेतात अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालून सात जुगाऱ्याना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 6 लक्ष 97 हजार 560 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ताब्यात घेण्यात आलेल्या सात जुगाऱ्यात मंगेश श्रवण भुसारी वय 33 वर्षे रा अंबाडी केसोरी, अशोक ठाकरे वय 32 वर्षे ,मयूर गिरी वय 30 वर्षे,रमेश किरमिरे वय 21 वर्षे ,खुशाल सहारे वय 30 वर्षे,सुरेंद्र मोटघरे वय 28 वर्षे ,मंगलमूर्ती थोटे वय 39 वर्षे सर्व रा वडोदा तालुका कामठी असे आहे.या सर्व आरोपीवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार ,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनार्थ एलसीबी पथकाने केले असून पुढोल तपास सुरू आहे.