– मागण्या मान्य न झाल्यास १६ ऑक्टोबर पासून बेमुदत संप – सीटू
– जिल्हा परिषद चौकात आशा व गटप्रवर्तकांचे तीव्र आंदोलन
भंडारा :-आशा व सुपरवायझर ( गटप्रवर्तक ) कर्मचारी युनियन ( सी आय टी यू ) भंडारा जिल्हा तर्फे जिल्हा परिषद चौक येथे आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी तीव्र आंदोलन करून सरकारवर रोष व्यक्त केला.राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची नेमणूक झाल्यापासून दिवसें दिवस कामाचा दबाब वाढवण्यात येत आहे. अल्प मोबदल्यात काम करणाऱ्या स्वयंसेविका स्वतः विधवा, घटस्फोटीत किंवा ज्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे अशा असून वाढत्या महागाईच्या काळात प्रपंच चालवणे कठीण होत आहे. त्यामुळे ४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कृती समितीने राज्यभर विविध मागण्या करता आंदोलन केले. त्या अनुषंगाने सी आय टी यू तर्फे जिल्हा परिषद चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व कॉ.राजेंद्र साठे, कॉ.उषा मेश्राम व कॉ. सुनंदा बसेशंकर यांनी केले.
धरणे आंदोलनात शेकडो आशा वर्कर व सुपरवायझर उपस्थित होत्या. आपल्या भाषणातून व निदर्शनातून कर्मचाऱ्यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या कामगार विरोधी भूमिकेचा तीव्र निषेध केला. मागण्या १५ ऑक्टोबर पर्यंत मान्य न झाल्यास १६ ऑक्टोबर पासून संपूर्ण राज्यातील आशा वर्कर व सुपरवायझर मागण्या मान्य होईपर्यंत संपावर जातील. अशी घोषणा सीटू तर्फे करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन शिस्ट मंडळ जिल्हाधिकारी – योगेश कुंभलकर यांना भेटून आरोग्य मंत्री व आरोग्य संचालक यांचे नावे निवेदन सादर केले. शिष्टमंडळात राजेंद्र साठे, सुनंदा बसेशंकर, सुशीला रामटेके, ममता चौरे, माला शिंगाडे, सुषमा कारेमोरे उपस्थित होते. आंदोलनात प्रामुख्याने महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन उपाध्यक्ष -कॉ. प्रीती मेश्राम उपस्थित होत्या. आंदोलनात कॉ. राजेंद्र साठे उषा मेश्राम, सुनंदा बसेशंकर, वनिता तीतिरमारे, मंजुषा जगनाडे, वनिता घुग्गुसकर, मनीषा कडव, शोभा रामटेके, अनिता भुरे, सोनिया चौरे, माधुरी डोंगरे, मंगला गौरी, महानंदा बसेशंकर,ज्योती अमृतकर, प्रेमा शेलारे उपस्थित होत्या.
मागण्या
(१) आशा व सुपरवायजर यांना ५ हजार दिवाळी बोनस द्या.
(२) गटप्रवर्तक यांचा आशा सुपरवायजर नामोल्लेख करण्यात यावा.
(३) आशा – सुपरवायजर यांना ऑनलाइन डाटा एन्ट्री सक्ती करू नये.
(४) आशा व सुपरवायझर यांना किमान वेतन देण्यात यावे.
(५) आशा सुपरवायझर यांना कंत्राटी कर्मचारी प्रमाणे समायोजित करण्यात यावे.
(५) सी एच ओ नसलेल्या सब सेंटर मधील आशा वर्कर ला आरोग्य वर्धिनीचा निधी मेडिकल ऑफिसर च्या सहीने देण्यात यावा.
(६) आशा सुपरवायझर यांना १५०० रु. महिना आरोग्य वर्धीनी निधी देण्यात यावा.
(७) शासकीय सुट्टीचे दिवशी लाभार्थीची माहिती मागवू नये.
(८) लाभार्थीची माहिती सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच मागवण्यात यावी. इतर वेळेस मॅसेज किंवा फोन करू नये.