– ५०२० पथविक्रेत्यांनी घेतला रुपये १० हजार कर्जाचा लाभ
चंद्रपूर :- प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना ( पीएम स्वनिधी योजना) अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपये कर्जाचा लाभ आतापर्यंत ५०२० पथविक्रेत्यांनी घेतला असुन योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक कर्ज प्रकरणे मंजुर करणाऱ्या विविध बँकांना गौरवपत्र देऊन आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पीएम स्वनिधी योजनेत सर्व बँकेकडे एकुण ९७०९ अर्ज प्राप्त झाले होते यातील ७४१९ अर्जधारक पात्र ठरले असुन यातील ५०२० अर्जधारकांना कर्ज देण्यात आले आहे. पथविक्रेत्यांनी केलेले अर्जाची छाननी करून विहीत मुदतीत अर्ज निकाली काढणाऱ्या व ७० टक्क्याहुन अधिक प्रकरणे मंजुर करणाऱ्या बँक ऑफ बडोदा,बँक ऑफ इंडिया,सेंट्रल बँक ऑफ इंडिया,इंडियन ओव्हरसीस बँक,पीएनबी बँक,स्टेट बँक ऑफ इंडिया,युको बँक व युनियन बँक ऑफ इंडिया या ११ बँकांना त्यांच्या कार्यासाठी गौरवपत्र देण्यात आले.
चंद्रपूर महानगरपालिका येथे यासंदर्भात आढावा बैठक आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली २१ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली होती. मनपाच्या वतीने स्वनिधी से समृद्धी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान संदर्भात बैठक घेऊन पथविक्रेत्यांसाठी केंद्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.
पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायाकरीता एका वर्षासाठी विनातारण कर्ज रु.१०,०००/- राष्ट्रीयकृत बँक मार्फत देण्यात येते. चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत ही योजना कार्यान्वित असून या योजनेच्या लाभाकरीता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु असुन सर्व पथविक्रेत्यांनी १० हजार रुपये कर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
या प्रसंगी जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक प्रशांत धोंगळे,इतर बँकेचे प्रबंधक,शहर अभियान व्यवस्थापक रफीक शेख,रोशनी तपासे,चिंतेश्वर मेश्राम,खडसे,लोणारे,मुन,करमरकर उपस्थीत होते.