– अ.भा.स्थानिक स्वराज्य संस्थेचा स्थानिक स्वराज्य संस्था दिवस
नागपूर :- अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दरवर्षी विविध अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश घेत असतात. विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विविध आस्थापना व स्थानिक स्वराज्य संस्थेत रूजू होतात. समाजामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून लोकभिमुख कार्य करणारे, समाजजागृती करणारे, कार्यक्षम विद्यार्थी विद्यार्थी घडतील, असा विश्वास माजी नगरसेवक तथा समाजसेवक निशांत गांधी यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे स्थानिक स्वराज्य दिनाचे आयोजन इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विभागीय संचालक जयंत पाठक उपस्थित होते.
पुढे बोलताना निशांत गांधी म्हणाले, प्रशासनात काम करताना झोकून कार्य करणारे आणि लोकाभिमुख कार्य करणारे अधिकारी व कर्मचारी असणे आवश्यक असते. स्थानिक स्वराज्य संस्थेतून काम करताना प्रशिक्षण आवश्यक असते. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत राबविण्यात येणारे अभ्यासक्रम केल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी होते. त्यामुळे ते प्रभावीपणे काम करू शकतात. महानगरपालिकेत व नगरपरिषदेत अनेक लोक असतात जे आपले काम पूर्ण सचोटीने करत असतात. मी नगरसेवक असताना अनेकदा हा अनुभव घेतला आहे. माझे जवळपास 80 टक्के ते 90 टक्के कामे तेच सोडवून देत असत. अशा कार्यक्षम अधिकाऱ्यांमुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्य अधिक सुरळीतपणे सुरू असते. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत संचालित करण्यात येणारे अभ्यासक्रम अतिशय महत्त्वाचे असून त्याचा प्रचार व प्रसार होणे अत्यंत गरजेचे असल्याचे निशांत गांधी यांनी म्हटले.
संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक प्रास्ताविक केले. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना मुळातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सक्षम करण्यासाठी झाली. संस्थेच्या स्थापनेमध्ये इतिहासातील मातब्बरमंडळींचा सहभाग आहे. यामध्ये गुलाम हुसेन हिदायत्त्तुल्ला, विठ्ठलभाई पटेल, दादासाहेब माळवणकर, सी.डी.बर्फीवाला यांचा समावेश आहे. संस्थेमार्फत राबविण्यात येणारे अभ्यासक्रमही कर्मचाऱ्यांना सक्षमता प्रदान करणारे असून यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे जयंत पाठक म्हणाले.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. संस्थेमार्फत संचालित करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये स्वच्छता निरिक्षक अभ्यासक्रमातून प्रथम क्रमांक अकिंता ठाकरे आणि समिक्षा मोरे यांना स्व.मोहन जावडेकर स्मृती, द्वितीय क्रमांक सपना सोनावणे आणि दिलीप संगेले यांना श्रीपाद मुजुमदार स्मृती, तृतीय क्रमांक अंकिता विहिरकर आणि रूचिका महाजन यांना स्व.हितेश हेरॉल्ड स्मृती तर स्थानिक स्वराज्य संस्था पदविका या अभ्यासक्रमात रश्मी सोनबिरसे आणि अभिलाषा राजपुत तर स्थानिक स्वराज्य सेवा पदविका अभ्यासक्रमात डॉ.अमोल शेळेके यांना एम.पी.टाकसांळे स्मृती, अग्निशमनकर्मी अभ्यासक्रमातून अनुजा सव्वालाखे यांना हरिदास वायगोकर स्मृती पुरस्कार देण्यात आला. यामध्ये स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षीसे देण्यात आली.
रक्तदान शिबिराचे आयोजन
स्थानिक स्वराज्य दिनाचे औचित्यसाधून संस्थेतर्फे सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाचे संचालक राम क्षीरसागर उपस्थित होते. त्यांचा संस्थेद्वारे सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत विविध अभ्यासक्रम व तसेच विविध उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षमता बांधणीसाठी राबविले जातात, हे खरोखर कौस्तुकास्पद आहे. समजात आपत्ती निवारण करण्यासाठी अग्निशमनकर्मी तयार केले जातात. त्यांना प्रशिक्षित केले जाते, हे खरोखर उल्लेखनीय आहे. यापुढेही असेच चारित्र्यवान, सद्गुणी आणि सामर्थ्यवान विद्यार्थी समाजासाठी पुढे येतील, असा विश्वास राम क्षीरसागर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी राम क्षीरसागर यांनी स्वःता रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण
मुख्य कार्यक्रमानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला स्वच्छता निरिक्षक जानेवारी व जुलै अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी गीते, नृत्य सादर केली. अग्ऩिशमन विद्यार्थीनीनी विविध गाण्यायंवर नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती या विषयावर उत्कृष्ट पथनाट्य सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन श्यामली मानकर आणि योगेश गेडाम यांनी केले.