– तात्काळ खबरदारीच्या उपाययोजना करा : ॲड. धर्मपाल मेश्राम यांची मागणी
नागपूर :- बुधवारी २६ जुलै रोजी रात्रभर आलेल्या मुसळधार पावसामुळे रिंग रोड खालील अनेक वस्त्या पूर्णत: जलमय झालेल्या आहेत. या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ या परिसरामध्ये खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. मेश्राम यांनी नागपूर महानगरपालिका प्रशासनाला केली आहे.
बुधवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात नागपुरातील वस्त्यांना बसला आहे. प्रभाग २६ मधील रिंग रोड खालील वस्त्या पवनशक्ती नगर, राज नगर, धरती माँ लोककल्याण नगर, न्यू सूरज नगर, संघर्ष नगर, भांडेवाडी डम्पिंग परिसर, माँ वैष्णोदेवी नगर, श्रावण नगर आदी वस्त्या पूर्णत: जलमय झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे भांडेवाडी कचरा डम्पिंग यार्डचे दूषित पाणी परिसरातील अनेक घरांमध्ये शिरल्याने साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांची मोठी तारांबळ उडते आहे. परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहे.
नागरिकांच्या या समस्येकडे प्राधान्याने लक्ष देउन नागपूर महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना राबवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.