-मनपाच्या तीन शाळेत ‘अद्ययावत स्टेम लॅब’चे उदघाटन
नागपूर, ता. २७ : मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी नागपूर महानगरपालिका विविध उपक्रम राबवित आहे. विज्ञानातील रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणितातील घटक विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने प्रयोगाच्या माध्यमातून शिकता यावे यासाठी मनपातर्फे साकारण्यात आलेली ‘अद्ययावत स्टेम लॅब’ची निर्मिती करण्यात आली आहे. या लॅब आधुनिक भारतात अत्याधुनिक शिक्षण देण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.
आमदार प्रवीण दटके यांच्या आमदार निधीतून मनपाच्या ७ शाळांमध्ये अद्ययावत लॅब तयार करण्यात आलेल्या आहेत. यापैकी गुरुवारी (ता. २७) मनपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळा, लालबहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळा, दुर्गानगर माध्यमिक शाळेतील ‘अद्ययावत स्टेम लॅब’चे महापौर दयाशंकर तिवारी यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, हनुमान नगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, नगरसेवक अभय गोटेकर, नगरसेविका हर्षला साबळे, उषा पॅलेट, मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सुके, पॉथ फाइंडर संस्थेचे प्रमुख धनंजय बालपांडे, पॉथ फाइंडर संस्थेचे राजेश मेश्राम, छाया पोटभरे, निकिता तपासे, तसेच तिन्ही शाळेचे मुख्याधापक आणि शिक्षक उपस्थित होते.
यावेळी पॉथ फाइंडर संस्थेचे प्रमुख धनंजय बालपांडे यांनी प्रयोगशाळेविषयी आणि विविध प्रयोगांविषयी महापौरांना माहिती दिली व काही प्रात्यक्षिकही करून दाखविले.
पुढे महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, मनाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची माहिती सहज, सोप्या पद्धतीने, खेळाच्या माध्यातून उपलब्ध व्हावी यासाठी मनपाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातीलच एक उपक्रम म्हणजे अपूर्व विज्ञान मेळावा आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून मनपाचे विद्यार्थी शहरातील अन्य शाळांच्या विद्यार्थ्यांना प्रयोगाच्या माध्यमातून सहज उपलब्ध होणाऱ्या संसाधनाद्वारे विज्ञानाचे धडे देतात. आता मनपाचे विद्यार्थी प्रत्येक विषय प्रयोगाच्या माध्यमातून शिकू शकणार आहेत. ‘स्टेम लॅब’ च्या माध्यमातून विद्यार्थी नैसर्गिक पद्धतीने आपल्या बुद्धीला विकसित करून खेळातून विज्ञानाला आत्मसात करू शकणार आहेत, असे महापौर यावेळी म्हणाले.
‘अद्ययावत स्टेम लॅब’मध्ये प्रत्येक विषय आणि घटकानुरूप वेगवेगळे प्रयोग आहेत. जे विद्यार्थी सहज करू शकणार आहेत. याशिवाय मनपाद्वारे विद्यार्थ्यांसाठी मोबाईल कॉम्पुटर लॅब आणि सुपर-७५ चे नियोजन सुद्धा केले आहे. सुपर-७५च्या माध्यमातून २५ विद्यार्थ्यांना जेईई, २५ विद्यार्थ्यांना नीट आणि २५ विद्यार्थ्यांना एनडीएचे प्रशिक्षक दिले जात आहे, अशी माहिती यावेळी महापौरांनी दिली. यावेळी महापौरांनी शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे आणि शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांचे अभिनंदन केले. तसेच आमदार प्रवीण दटके यांनी आपल्या आमदार निधीतून ७० लाख देऊन मनपाच्या ७ शाळांमध्ये स्टेप लॅबची निर्मिती करून दिली त्याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी आ. प्रवीण दटके यांचे आभार मानले.
आ. प्रवीण दटके यांच्या निधीतून ७ लॅबची निर्मिती
मनपाच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी कोणत्याही विषयात मागे राहू नये यासाठी मनपा सतत प्रयत्नशील असते. ज्येष्ठ नगरसेवक आमदार प्रवीण दटके यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या ७० लाखाच्या अनुदानातून मनपाच्या ७ शाळांमध्ये अद्ययावत प्रयोग लॅब तयार करण्यात आलेल्या आहेत. या सर्व लॅब तयार झाल्या असून गुरुवारी तीन लॅबचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. उर्वरित शाळांमधील लॅबचे शुक्रवारी आणि सोमवारी महापौरांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी यावेळी दिली.
लॅब तयार करण्यात आलेल्या शाळा
१. लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळा
२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी माध्यमिक शाळा
३. एम.ए.के. आझाद उर्दू माध्यमिक शाळा
४. दुर्गानगर मराठी माध्यमिक शाळा
५. जी.एम. बनातवाला इंग्रजी माध्यमिक शाळा
६. राममनोहर लोहिया हिंदी माध्यमिक शाळा
७. संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा
या शाळांच्या विज्ञान विषयाच्या शिक्षकांना या लॅबमध्ये पूर्ण प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळे मनपाचे विद्यार्थीसुद्धा अभ्यासक्रमातील जवळपास २०० प्रयोग ते स्वतः करू शकणार आहेत. यावेळी शिक्षण समिती प्रमुख दिलीप दिवे यांनी आमदार प्रवीण दटके यांचे आभार मानले.