स्वाईन फ्लू प्रतिबंधासाठी लसीकरण

नागपूरला 5000 इन्फल्यूएंझा लसमात्रा प्राप्त : अतिजोखमीच्या व्यक्तींनाच लस

नागपूर : कोव्हिड रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच नागपूर शहरात इन्फल्युएंझा A (H1N1) किंवा स्वाईन फ्लू या आजाराचे सुद्धा रुग्ण वाढत आहेत. यावर प्रतिबंधासाठी शहरात स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला सुरूवात केली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सेवा संचालनालयाद्वारे नागपूरला 5000 इन्फल्युएंझा लसमात्रा प्राप्त झालेल्या आहेत. ही लस सध्या अतिजोखमीच्या व्यक्तींना देण्यात येणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार लवकरच शहरात लसीकरण मोहिम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती साथरोग विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी दिली आहे.

नागपूर शहरामध्ये स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्या सतत वाढत आहे. याशिवाय शहरात स्वाईन फ्लू बाधित चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये एक स्त्री व तीन पुरूष आहेत. मृतकांमध्ये तिघे नागपूर शहरातील आहेत तर एक शहराबाहेरील असल्याची नोंद आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूपासून संरक्षणासाठी शासनाद्वारे प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात करण्यात येत आहे. सुरूवातीला अतिजोखमीच्या व्यक्तींनाच लस देण्यात येणार आहे. यामध्ये दुस-या आणि तिस-या तिमाहितील गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणारे व्यक्ती, फ्लू रुग्णांची तपासणी, देखभाल आणि उपचारात सहभागी डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचारी यांना इन्फल्युएंझा लस दिली जाईल.

इन्फल्यूएन्झा लसीकरण हे ऐच्छिक व मोफत आहे. मनपाच्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. ही लस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात इन्फल्यूएन्झा विरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास किमान दोन आठवड्याचा कालावधी लागतो. याप्रकारे मिळालेली प्रतिकारशक्ती एक वर्षापर्यंत टिकून राहू शकते. त्यामुळे हे लसीकरण दरवर्षी घेणे आवश्यक ठरते.

लसीकरणामुळे काही जणांना ताप येणे, थकवा, ॲलर्जी, इंजेक्शनच्या जागी सूज येणे, अंग खाजविणे, डोकेदुखी, घाम येणे, स्नायू-सांध्यांमध्ये वेदना अथवा इतर प्रकारचा त्रास होउ शकतो. त्यामुळे अशा प्रतिक्रिया उद्भवल्यास लसीकरण घेतलेल्या लाभार्थ्यांनी घाबरून जाउ नये, असे आवाहनही मनपाद्वारे करण्यात येत आहे.

अधीक माहितीकरीता 9175414355 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क करावा.

स्वाईन फ्लू टाळण्याकरीता हे करा

  हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत.

 गर्दीमध्ये जाणे टाळा.

 स्वाईन फ्लू रुग्णापासून किमान ६ फूट दूर रहा.

 खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा.

  भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी.

  पौष्टीक आहार घ्यावा.

हे करु नका

  हस्तांदोलन अथवा आलिंगन,

  सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.

  डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

संगीताची जाण समृध्द करण्यासाठी ‘रागरंजन’ उपयुक्त - राज्यपाल कोश्यारी

Fri Aug 5 , 2022
नागपूर : संगीत हे ईश्वरासोबत जोडले जाण्याचे एक प्रभावी माध्यम असून त्याची साधना केल्याने मानसिक स्वास्थही चांगले राहते. संगीतात ही नैसर्गिक क्षमता असल्यामुळे मुलांना बालपणापासून शारीरिक, बौद्धिक विकास साधण्यासाठी संगीताची गोडी निर्माण करणे गरजेचे आहे. शास्त्रीय संगीताचे आध्यात्मिक महात्म्य ‘रागरंजन’ या पुस्तकात अंतर्भूत असून या क्षेत्रात कारकीर्द घडविणाऱ्यांसाठी रागरंजन हे पुस्तक मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com