नागपूर :- राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ हातमाग कामगारांनी घेण्याचे आवाहन वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक उपआयुक्त सीमा पांडे यांनी केले आहे.
राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम 2021-22 ते 2025-26 अंतर्गत दिशानिर्देशानुसार जीवन विमा योजनेसाठी नोंदणी केलेल्या 18 ते 50 वर्ष वयोगटातील हातमाग कामगाराचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाला त्याला 2 लाख रुपये विमा अनुज्ञेय आहे. तसेच प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजने अंतर्गत 18 ते 70 वर्ष वयोगटातील हातमाग कामगारांचा मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अंपगत्व आल्यास 2 लाख रूपये तसेच अंशत: अंपगत्व आल्यास 1 लाख रूपये विमा अनुज्ञेय आहे. महात्मा गांधी बुनकर विमा योजने अंतर्गत लाभार्थी पॉलिसी धारकांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांना 60 हजार, अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अंपगत्व आल्यास 1 लाख 50 हजार व अंशत: अपंगत्व आल्यास 75 हजार रुपये विमा रकम अनुज्ञेय आहे.
याशिवाय वस्रोद्योग विभागामार्फत हातमाग विणकरांना उद्योगासाठी मुद्रा योजना, मार्जीन मनी योजना तसेच हातमाग कामगारांच्या मुलांना 2 लाखापर्यंत शिष्यवृत्ती योजनांचा लाभ देण्यात येतो.
या सर्व योजनांचा लाभ जास्तीत जास्त हातमाग कामगारांनी घ्यावा व अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपआयुक्त (वस्त्रोद्योग) यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत क्र. 2, आठवा माळा, सिव्हील लाईन, नागपूर येथे संपर्क साधावा, असे उपायुक्त सीमा पांडे यांनी कळविले आहे.
@ फाईल फोटो