-‘प्रशासनातील मराठी’ या विषयावर आज परिसंवाद
नागपूर, दि. 24 : प्रशासनामध्ये मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा. तसेच मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने शासनातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त प्रशासनातील मराठी या विषयावर उद्या मंगळवार, दिनांक 25 जानेवारी रोजी दुपारी 5 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशासनातील मराठी या विषयावर आधारित परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा राहणार आहेत. परिसंवादात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे, अभ्यासक आशुतोष शेवाळकर तसेच विदर्भ साहित्य संघाचे विलास मानेकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त आयोजित चर्चासत्रास उपस्थित राहण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, विभागीय भाषा संचालक हरेश सूर्यवंशी तसेच विभागीय ग्रंथपाल श्रीमती विभा डांगे यांनी केले आहे.