– स्वच्छ मोहल्ला स्पर्धेचा सकारात्मक परिणाम
नागपूर :- स्वतःच्या घराची व परिसराची स्वच्छता ही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच ‘स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे’ असे म्हटले जाते. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही गोष्ट वैयक्तिक व सामूहिक दृष्टीने खूप महत्त्वाची असून, या परिसराचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. स्वच्छतेची जाणीव ठेवत नागपूर महानगरपालिकेच्या हनुमान नगर झोनचे स्वच्छता कर्मचारी, अधिकारी आणि आझाद पार्क सुधार समिती यांच्या सहकार्याने आझाद पार्क गणेश नगर येथे श्रमदान व स्वच्छता जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
नागपूर महानगरपालिका आणि नागपूर@२०२५ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ मोहल्ला स्पर्धेत’ सहभागी असलेल्या आझाद पार्क सुधार समितीच्या श्रमदानाने संपूर्ण परिसर स्वच्छ बहरल्याचे दिसून आले. श्रमदान आणि स्वच्छ जनजागृती उपक्रम हा स्वच्छ मोहल्ला स्पर्धाचा सकारात्मक परिणाम असल्याचे दिसून आहे.
नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या या श्रमदान व स्वच्छता जनजागृती उपक्रमात आझाद पार्क, गणेशनगर परिसरातील ६० हुन अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. परिसरातील नागरिकांनी सर्वप्रथम संपूर्ण परिसर स्वच्छ केला. नागरिकांनी स्वतः झाडू, फावडा आणि इतर साहित्य घेऊन परिसरातील मार्ग साफ केले. तसेच रस्त्यालगत असलेले गवत, झाडाचा पालापाचोळा, जमा झालेला कचरा, प्लास्टिक फावड्याच्या साहाय्याने वेगवेगळा केला. तर श्रमदानात जमा झालेला ओला कचरा नागरिकांनी हिरव्या कचरा कुंडीत व सुका कचरा निळ्या कचरा कुंडीत टाकला. विलगीकरण केलेला हा कचरा मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला. या श्रमदानामुळे संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर असे बहरून आले. त्यानंतर आझाद पार्क सुधार समितीच्या सदस्यांद्वारे स्वच्छता जनजागृती मार्गदर्शन करण्यात आले. यात कंपोस्टिंग सह स्वच्छतेविषयी माहिती देण्यात आली.
मनपा आणि नागपूर@२०२५ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ मोहल्ला’ स्पर्धेच्या अनुषंगाने आझाद पार्क सुधार समिती, आझाद पार्क गणेशनगर परिसरात स्वच्छते विषयी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, परिसरात विविध जनजागृती बॅनर लावण्यात येत आले आहेत. यात विशेषतः कचरा वर्गीकरण, प्लास्टिक पिशव्यांवर बंदी, अस्वच्छता पसरवू नये अशा बॅनरचा समावेश आहे. अशी माहिती परिसरातील नागरिक विलास गावंडे यांनी दिली.
परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. परिसर स्वच्छता एकदाच करून भागणारी गोष्ट नाही तर सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेस प्राधान्य देत, स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यास सहकार्य करावे असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.