थंड हवेचे ठिकाण म्हणून पन्हाळ्याची ओळख वाढत असताना पन्हाळ्याचे महत्त्व एक किल्ला म्हणून मागे पडू नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज : प्राध्यापक मीना पोतदार
कोल्हापूर :- थंड हवेचे ठिकाण म्हणून पन्हाळ्याची ओळख वाढत असताना पन्हाळ्याचे महत्त्व एक किल्ला म्हणून मागे पडू नये यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याच्या बाबतीत आपण राजस्थान सारख्या राज्यांकडून खूप काही शिकू शकतो. उत्तरेतल्या किल्ल्यांचे संवर्धन पाहता त्यांनी यामागे केलेले प्रयत्न दिसून येतात, परंतु शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची रचना आणि त्यांच्याद्वारे निर्मित किल्ल्यांमध्ये दिवाण-ए-आम आणि दिवाण-ए-खास यासारख्या भेदभावाचा अभाव आपल्याला शिवाजी महाराजांच्या रयतेचा राजा असण्याची साक्ष देतो, असे शिवाजी विद्यापीठातील भूगोल विषयाच्या सहयोगी प्राध्यापक मीना पोतदार म्हणाल्या. त्या, जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने 18 एप्रिल रोजी केंद्रीय संचार ब्युरो कोल्हापूर आणि पन्हाळा विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा किल्ला येथे आंतरराष्ट्रीय वारसा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
यावेळी बोलताना पन्हाळ्याचे मुख्य अधिकारी चेतन माळी म्हणाले की पन्हाळा नगरपरिषद ही लाईट आणि साऊंड शो चा वापर करून एका डॉक्युमेंटरीद्वारे पन्हाळगडचा इतिहास जिवंत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आपल्या ऐतिहासिक घटना पडद्यावर मांडून ही डॉक्युमेंटरी पर्यटकांसाठी एक आकर्षणाचा विषय निश्चितच बनेल. स्वच्छतेच्या बाबतीत पन्हाळा नगरपरिषद ही देश पातळीवर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडून पुरस्कार प्राप्त करत आहे असे मुख्याधिकारी पुढे म्हणाले.
सकाळी आठ वाजता ऐतिहासिक ताराराणी वाड्यामध्ये स्थित असलेल्या पन्हाळा विद्यामंदिर शाळेच्या परिसरातून गडभ्रमंतीद्वारे या कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी आंतरराष्ट्रीय वारसा दिनाच्या विषयावर आधारित विविध स्पर्धांच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. दरवर्षी 18 एप्रिल हा ऐतिहासिक वास्तू आणि स्मारके यांच्या जतनासाठी जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो
पन्हाळ्याची पार्श्वभूमी
हा किल्ला राजा भोज यांनी 1178-1209 मध्ये बांधला आहे आणि डेक्कन किल्ल्यांमध्ये सर्वात मोठा किल्ला आहे. शिवाजी महाराजांची आठवण करूण देणारा पन्हाळा हा एक ऐतिहासीक किल्ला आहे. येथे आजही शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होते. ह्या गडाच्या आत मध्ये संभाजी मंदीर, सोमेश्वर मंदीर, तीन दरवाजा, राज दिंडी ई. आहेत. हा किल्ला कोल्हापूरच्या उत्तरेला 20 कि.मी. अंतरावर आहे, हा गड सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये येतो, हा किल्ला जमीन सपाटीपासून 400 मी. उंचीवर येतो.सामरिक दृष्टीने पन्हाळा गडाला महत्वाचे स्थान आहे.