प्रवाशांच्या डोळ्यांदेखत महिला गेली रेल्वेखाली

– धावत्या रेल्वेत बसण्याच्या नादात गेला जीव

– हृदयाचा थरकाप उडविणारी घटना

नागपूर :-मुलींसाठी खाद्यपदार्थ घेऊन ती धावत्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात होती… लोखंडी दांड्यावरून हाताची पकड सैल झाली… अन् ती चक्क फलाट आणि रेल्वे गाडीच्या मधातील गॅपमध्ये खाली गेली… ‘धावाऽ वाचवाऽऽ ती गेलीऽऽऽ’ अशी एकच आरडाओरड झाली. मात्र, गाडी थांबेपर्यंत तिच्या कवटीला चांगलीच जखम झाली होती. प्रचंड रक्तस्राव झाला अन् तिचा श्वास थांबला…

हृदयाचा थरकाप उडविणारी ही घटना आज मंगळवारी सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक 1 वर प्रवाशांच्या डोळ्यांदेखत घडली.

गायत्री पांडे (45) रा. नालंदा, बिहार असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती बेंगळुरूला स्टेट बँकेत व्यवस्थापक आहेत. त्यांना दोन मुली आहेत. मुलींसह त्या पतीला भेटण्यासाठी गेल्या होत्या. बेंगळुरू-दाणापूर हमसफर एक्सप्रेसने परतीच्या प्रवासाला निघाल्या. बी-3 कोचमधून त्या प्रवास करीत होत्या. मंगळवारी सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक 1 वर गाडी आली. गाडी थांबताच प्रवासी उतरले. अनेक प्रवासी खाद्यपदार्थ, नास्ता, पाण्याची बाटली वगैरे घेऊन आपल्या बर्थवर बसले. मात्र, प्रवाशांच्या गर्दीत खाद्यपदार्थ घेण्यास गायत्रीला वेळ लागला. दरम्यान, गाडी सुरू झाली. खाद्यपदार्थांसह त्या धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करीत होत्या. लोखंडी दांड्याला पकडून त्या गाडीत बसणार तोच त्यांच्या हाताची पकड सैल झाली. त्या थेट फलाट आणि रेल्वे गाडी याच्या मधातील गॅपमधून खाली घसरत गेल्या. त्या भयभीत झाल्या. श्वासाची गती वाढल्याने काय करावे काही सुचेनासे झाले. त्यांनी जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. धडधडत्या गाडीचे लोखंडी भाग तिच्या डोक्यावर आदळत गेले आणि ती रक्तबंबाळ झाली.

प्लॅटफार्मवरील प्रवाशांनी आरडाओरड केली. काही वेळातच गाडी थांबली. आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिस घटनास्थळी पोहोचले. तिला बाहेर काढले. मात्र, प्रचंड रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. पोलिस हवालदार संजय पटले, अमोल हिंगवे आणि रूपाली गुलाने यांनी घटनास्थळी पंचनामा करून नोंद केली.

अन् मुलींनी फोडला हंबरडा!

आरडाओरड कोणासाठी होत आहे, याबद्दल गायत्रीच्या दोन्ही मुलींना काही कळत नव्हते. मात्र, आई आली नाही. कदाचित दुसर्‍या डब्यात बसली असावी, असा त्यांचा समज होता. गाडी थांबल्यावर गायत्रीच्या दोन्ही मुली खाली उतरल्या. पाहतात तर त्यांची आई रक्तबंबाळ स्थितीत होती. दोन्ही मुलींनी एकच हंबरडा फोडला. या घटनेची माहिती गायत्रीच्या पतीला देण्यात आली. विमानाने थेट त्यांनी नागपूर गाठले. शवविच्छेदनानंतर गायत्रीचे पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले

Wed Feb 8 , 2023
संदीप बलविर, प्रतिनिधी – नागपूर व भंडारा वन विभाग ची संयुक्त कार्यवाही – मुद्देमालासह दोन आरोपी ताब्यांत नागपूर :- भंडारा वन विभाग अंतर्गत भंडारा वन परिक्षेत्र मधील मनेगाव येथे सापळा रचून २ आरोपी सह वन्यप्राणी खवल्या मांजर नग १ जिवंत जप्त करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, गुप्तहेरांने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे कार्यालयाला दिलेल्या माहिती नुसार खवल्या मांजरची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!