नागपूर : देशाच्या विविध भागातील खनिज संपत्ती, निसर्ग आणि वनसंपदा जपणारा आदिवासी समाजच सामाजिकदृष्टया मागास राहिलाय हे कटूसत्य आहे. आदिवासींच्या बलस्थानांचा उपयोग करून त्याला विज्ञानाची जोड देत त्यांच्या विकास प्रक्रियेला गतिमान करता येईल, असा सकारात्मक सूर आज आदिवासी विज्ञान काँग्रेसच्या परिसंवादात निघाला.
भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये शहीद बिरसा मुंडा सभागृहात ‘आदिवासींच्या विकासासमोरील आव्हाने’, या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी नागालँड विद्यापीठाचे माजी कुलगुरु पी.लाल हे होते. रोहतक येथील एम.डी. विद्यापीठाच्या प्रा. विनोद बाला टक्साक, गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.हेमलता वानखेडे, मैसूर स्थित सीएसआयआर अन्न तंत्रज्ञान विभागाचे संशोधक डॉ.प्रकाश हलामी यांनी परिसंवादात सहभाग घेतला.
डॉ. पी.लाल यांनी नागालँड मधील आदिवासींच्या समृद्ध जीवन पद्धतीवर प्रकाश टाकत या समाजासमोरील आव्हानही अधोरेखीत केली. राज्यात अनगामी,आवो,चकेशांग,चांग अशा एकूण 17 आदिवासी जमाती असून कृषी आणि नैसर्गिक संपदेत त्यांनी अभूतपूर्व योगदान दिले आहे. आदिवासींद्वारे 650 मसाल्याच्या जिन्नसांचे उत्पादन घेण्यात येते. आदिवासींद्वारे वर्षाकाठी 400 मेट्रीक टन मध उत्पादन घेण्यात येते. 2030 पर्यंत हे उत्पादन 500 मेट्रीक टन करण्याच्या दिशेने कार्य सुरु आहे. तथापि, पायाभूत आणि आरोग्य सुविधांच्या अभावी या समाजाच्या विकासासमोर अडसर निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी विज्ञानाच्या मदतीने आदिवासी समाजाच्या विविध क्षेत्रातील बलस्थानांचा उपयोग करणे गरजेचे असल्याचे डॉ लाल यांनी सांगितले.
डॉ. विनोद बाला यांनी आदिवासी समाजाने दिलेल्या योगदानांबाबत निरीक्षणे मांडली. आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी या समाजासमोरील समस्यांबाबतचे निरीक्षणही त्यांनी मांडली. या समाजाला शिक्षीत करून विज्ञानाच्या मदतीने समस्यांचे निराकरण करता येईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. हेमलता वानखेडे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा व जीवनपद्धतीवर प्रकाश टाकत समस्यांबाबतही भाष्य केले. आदिवासी महिलांची रेशीम उद्योग,दूग्ध आणि मत्स्य व्यवसायातील प्रगतीही त्यांनी मांडली. मलेरीया,टिबी रोगांच्या साथीमुळे जिल्ह्यातील आदिवासींसमोर उभी ठाकलेली समस्या मांडतानाच विज्ञानाच्या मदतीने यावर उपाय काढण्याचा सकारात्मक विचारही त्यांनी मांडला.
डॉ.प्रकाश हलामी यांनी सांगितले की, बदलत्या जीवनशैलीमुळे शहरी भागातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली मानवी जठरातील जीवाणुंच्या तुलनेत आदिवासींच्या जेवणातील अन्नघटकांमुळे त्यांच्या आयुर्मानात सकारात्मक बदल झाला आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासींना शुद्ध हवा पाण्यासोबतच ताजी फळे, भाज्या मिळतात. त्यामुळे त्यांच्या जठरामध्ये चांगल्या जीवाणुची निर्मिती होत असल्याचे त्यांनी आपल्या संशोधनात मांडले आहे. आदिवासींचा विकास साधण्याच्या दिशेने विज्ञानाचा आग्रह धरतानाच त्यांच्या बलस्थानाचाही वापर व्हावा असे विचार त्यांनी मांडले.