नागपूर :-अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उध्वस्त केल्याच्या निषेधार्त आंबेडकरी जनतेने भव्य मोर्चा काढला. उध्वस्त केलेले भवन त्याच ठिकाणी उभारावे लागेल. याशिवाय 20 एकर जागेवर बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारावे अशी मागणी मोर्चेकर्यांची होती.
कृति समीतिच्या माध्यमातून शहरातील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याना एकत्रित करून जनआंदोलन उभारले. मंगळवारी सकाळी यशवंत स्टेडीयम येथून निघालेल्या मोर्चात आंबेडकरी जनतेचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. पांढरे कपडे घातलेले अनुयायी आणि निळे ध्वज मोर्चाचे लक्ष वेधून घेत होते.
सीताबर्डी मार्गाने निघालेल्या मोर्चाला मॉरीस कॉलेज टी पाँइंटवर थांबविण्यात आले. मोर्चाचे रुपांतर सभेत झाल्यानंतर साहित्यिक, लेखक, कवि, अनुयायी, लोकप्रतिनिधी यांनी मार्गदर्शन केले. स्मारकाची जागा बळकविण्यासाठी महापालिकेने अवैधरित्या आंबेडकर भवन तोडून खाजगी कंपनीला पर्यटन विकासाच्या नावावर ही जागा दिली आहे. या निर्णयाने आंबेडकरी जनतेत रोष आहे. पर्यटनाच्या नावावर बाबासाहेबांच्या स्मारकाची जागा हडपण्याचा प्रयत्न आंबेडकरी जनता हाणून पाडल्या शिवाय राहणार नाही, असा सूर आंबेडकरी जनतेचा होता.
मोर्चाचे मुख्य संयोजक माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांच्यासह कमल गवई, प्रा. रणजित मेश्राम, बाळू घरडे, डॉ. राजेंद्र गवई, प्रा. माजी खासदार जोगेंद्र कवाडे, माजी आमदार उपेंद्र शेंडे, माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, डॉ. सुचित बागडे, प्रा. राहुल मुन, दिनेश अंडरसहारे, धनराज डहाट, तक्षशिला वाघधरे, डॉ. सरोज आगलावे, डॉ. सरोज डांगे, भिक्खु संघाचे भंते हर्षदीप, भंते हर्षबोधी, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, उपासक उपासिका आणि आंबेडकरी जनता सहभागी झाली होती.
…चौकट…
सभागृहात प्रश्न मांडणार
बाबासाहेबांचे स्मारक त्याच ठिकाणी होईल, असा ठाम विश्वास व्यक्त करून हा प्रश्न बुधवारी सभागृहात मांडणार असल्याचे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी मोर्चेकर्यांना दिले. आमदार अमोल मिटकरी यांनीही मोर्चास्थळी भेट दिली आणि बाबासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न बुधवारी लक्षवेधीत घेणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार विकास ठाकरे यांनीही स्मारकासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
…चौकट…
भव्य स्मारक व्हावे-डॉ. राजेंद्र गवई
कंत्राटदाराला दिलेली जागा परत घेवून अंबाझरीत 20 एकर जागेवर बाबासाहेबांचे भव्य स्मारक बांधावे. स्मारकात डीजीटल वाचनायल, मेडीटेशन केंद्र, मार्गदर्शन केंद्र, बाबासाहेबांचे साहित्य असावे असे डॉ. राजेंद्र गवई म्हणाले. यावेळी डॉ. कमल गवई यांनी सुध्दा मार्गदर्शन केले. त्यांनी राजेंद्र गवईच्या मागणीला दुजोरा दिला.
….चौकट….
मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांशीच चर्चा
दुपारी 1.30 वाजता मोर्चा मॉरीस टी पाँइंटवर थांबविला. भाषण सुरू असतानाच शिष्टमंडळाला विधानभवनात चर्चेसाठी निमंत्रण दिले. मात्र, मोर्चेकर्यांनी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांशीच चर्चा करणार असल्याचे सांगितले. मोर्चेकरी शेवटपर्यंत आपल्या मागणीवर ठाम होते. सायंकाळी पाच पर्यंत बोलाविने न आल्याने मोर्चा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. बुध्द वंदना घेतल्यानंतर मोर्चाचा समारोप झाला. मात्र, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांकडून बोलाविने आल्यास चर्चेला आम्ही तयार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
@ फाईल फोटो