– ‘मजीप्रा’च्या कामांचा दर्जा रसातळाला
नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (MJP) माध्यमातून सुरू करण्यात येत असलेल्या कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याने ठेकेदार जिल्हा परिषदेच्या (ZP) रडावर आले आहेत.
जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत याबाबत ठेकेदार आणि अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी एमजेपीच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त करून यापुढे अशा प्रकारची कामे व तक्रारी खपवून घेतल्या जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला. जि.प. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन समितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत सदस्यांसह पदाधिकाऱ्यांनी एमजेपीच्या माध्यमातून झालेल्या कामांवर नाराजी व्यक्त केला. ग्रामीण भागात याच्या मार्फत कोट्यवधींच कामे सुरू आहे. जिल्ह्यातील बोखारा, बिडगाव, दवलामेटी, फेटरी आदी ठिकाणी एमजेपीच्या माध्यमातून झालेली नळ योजनांच्या कामांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत. एमजेपीने केलेल्या कामाचा दर्जा योग्य नाही. अनेक ठिकाणी कित्येक दिवसांपासून कामे अपूर्ण आहेत. जिथे कामे पूर्ण झालीत तिथे पाण्याचा पुरवठा होत नाही. पाण्याची गळती होत आहे. बिल भरणा करण्याच्या ठिकाणी कर्मचारी नसतात. अशा अनेक तक्रारींचा पाढाच सदस्यांनी बैठकीत वाचून दाखविला.
यावेळी बैठकीला उपस्थित एमजेपीच्या अधिकाऱ्यांनाही ही सर्व कामे तातडीने सुधारावावी. नाहीतर वरच्या पातळीवर तक्रार करण्यात येईल, असा इशाराही अधिकाऱ्यांना देण्यात आला. बैठकीला उपाध्यक्षा कुंदा राऊत, महिला व बाल कल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे, सभापती राजकुमार कुसुंबे, प्रवीण जोध व सदस्यांसह अधिकारी उपस्थित होते.
@ फाईल फोटो