अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने श्री त्रंबक गणपतराव कावलकर व्याख्यानमाला नुकतीच संपन्न झाली. याप्रसंगी गोवा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एम.के. जनार्थनम हे वक्ते म्हणून उपस्थित राहिले, त्यांनी ‘वनस्पती आणि लोक तसेच वर्गीकरण साधने’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.जी.व्ही. पाटील, विशेष अतिथी म्हणून वनस्पतीशास्त्र माजी विभागप्रमुख डॉ.यु.एस. चौधरी, डॉ.ए.यु. पाचखेडे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा नाठार व्यासपीठावर उपस्थित होते.
विषयाची मांडणी करतांना डॉ. जनार्थनम म्हणाले, मानवी जीवन, संस्कृती, सभ्यता आणि वनस्पतींच्या भूमिकेबद्दल विस्तृत माहिती दिली. मसाले व इतर वनस्पतींमुळे तत्कालीन खलाश्यामार्फत खंड शोध कसा केला गेला व त्याकाळी भारताची भौगोलिक स्थिती व व्यापार मार्ग, याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. वास्को द गामा यांचे भारतीय खंडात आगमन, निर्यात व धोरण तसेच भारतातील जैवविविधता यांचा परस्पर असलेल्या संबंधांमुळे त्याकाळी भारताची अर्थव्यवस्था मजबूत होती. भारतीय मसाल्याचे महत्व त्याकाळी अधिक असल्यामुळे त्यांच्या वापरामुळे भारतीय अर्थव्यवस्था बळकट झाली. भारतात उष्णकटीबंधीय अमेरिकन वंशाच्या बहुतेक वनस्पतींचे सेवन आणि लागवड केल्या जात आहे. प्रत्येक समुदयात वनस्पतींचे महत्वाचे स्थान आहे.
बीजांचे राजकारण आणि अर्थव्यवस्था भविष्यात बीज युद्धाला कारणीभूत ठरु शकतात. महाद्विपीय प्रवाहामुळे वनस्पतींचे स्थलांतरण झाले, त्यामुळे भारतीय पारंपारिक संस्कृती आणि वनस्पतींचे परस्पर संबंध कसे होते, याविषयी माहिती दिली. उसापासून अमेरिकेत साखर उतारा करण्यासाठी त्याकाळी भारतीय व्यापायांना गुलाम बनविले गेले. अनेक पुस्तकात उल्लेख आहे की, भारतीय वंशाच्या वनस्पती जगात अनेक ठिकाणी दिसतात. वनस्पतीशास्त्रामध्ये शास्त्रोत पद्धतीने वनस्पतींची ओळख पटविण्यासाठी लागणारी संसाधने व त्याचा वापर करुन वनस्पतींचे कुटुंब व वनस्पती कशा ओळखाव्या, याविषयी सविस्तर विवेचन डॉ. जनार्थनम यांनी व्याख्यानात केले. याप्रसंगी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिलीत.
अध्यक्षीय भाषणात माजी कुलगुरू डॉ.जी.व्ही. पाटील म्हणाले, श्री त्रंबक गणपतराव कावलकर यांनी आपले संपूर्ण जीवन वनस्पतीशास्त्रातील संशोधनावर केंद्रीत केले. त्यांच्या संशोधन कार्यामुळे अनेक संशोधने पुढे आलीत. त्यांनी ही व्याख्यानमाला सुरु करण्याकरीता दाननिधी दिल्यामुळे वनस्पतीशास्त्रातील संशोधन आणि विचार जास्तीतजास्त विद्याथ्र्यांपर्यंत पोहोचेल, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक भाषणातून व्याख्यानमाला आयोजनामागील भूमिका वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा नाठार यांनी मांडली. यावेळी प्रमुख अतिथी डॉ.यु.एस. चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन प्रा.के.सी. मोरे यांनी, तर आभार डॉ.पी.ए. गावंडे यांनी मानले. व्याख्यानाला वनस्पतीशास्त्र विभागाचे अभ्यासक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.