सामाजिक न्याय विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन
नागपूर : जिल्ह्यात 26 नोव्हेंबर संविधान दिन ते 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त डॅा. सिद्धार्थ गायकवाड यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
समता पर्वादरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी डॅा. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ते संविधान चौकादरम्यान प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. तर सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाचे उदघाटन दीक्षाभूमी येथील डॅा. बाबासाहेब आंबेडकर आडिटोरियम येथे करण्यात येईल. २७ नोव्हेंबर रोजी शासकीय वसतीगृहे व शासकीय निवासी शाळामध्ये सेल्फ डिफेन्स कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी संविधान अधिकार व कर्तव्ये या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. २९ नोव्हेंबरला रमण विज्ञान केंद्र व जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहांना भेटी देण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील तृतियपंथी, ज्येष्ठ नागरिक व कर्मचा-यांच्या आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. १ डिसेंबर रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या अधिनस्त शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा, समाजकार्य महाविद्यालये, विजाभज आश्रमशाळा यांच्या सेवाविषयक बाबींविषयी कर्मचारी दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. २ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवड झालेल्या गावामध्ये श्रमदान कार्यक्रम कळमेश्वर तालुक्यातील भोगली येथे आयोजित करण्यात आला आहे. ३ डिसेंबरला शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृहे, समाजकार्य महाविद्यालये, विमुक्त जाती भटक्या जमातीच्या आश्रमशाळेमध्ये निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. ४ डिसेंबरला स्ट्रेस मॅनेमजमेंट या विषयावर कर्मचा-यांकरिता आयोजन करण्यात येणार आहे. ५ डिसेंबरला सफाई कामगारांच्या वस्तीमध्ये भेट देण्यात येणार आहे. ६ डिसेंबर रोजी संविधान चौक येथे माल्यार्पण कार्यक्रमाचे आयोजन करीत समता पर्वाचा समारोप करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला सहायक समाज कल्याण आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके उपस्थित होते.