नागपूर : सर्वसामान्यांच्या हातात अधिकार, कर्तव्य आणि देशाची सूत्रे देणाऱ्या महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज महापरिनिर्वाण दिनी राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मत्स्य पालन व युवक कल्याण, क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दीक्षाभूमी येथे विनम्र अभिवादन केले.
आज सकाळी 11 वाजता डॉ. नितीन राऊत, सुनील केदार, आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी दीक्षाभूमीला भेट देत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण केले. त्यानंतर त्यांनी दीक्षाभूमीवरील स्तूपामध्ये जाऊन बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला पुष्पांजली अर्पण अर्पण केली.दोन्ही मंत्र्यांनी याठिकाणी दीक्षाभूमी स्मारक समितीमार्फत सुरू असलेल्या रक्तदान शिबिरालाही भेट दिली. रक्तदानासाठी मोठ्या प्रमाणात आलेल्या युवकांशी त्यांनी संवाद साधला.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून सर्वसमावेशक धर्मनिरपेक्ष अशा भारताची निर्मिती केल्याचे सांगितले. सामान्य नागरिकाला देशाप्रतीचे कर्तव्य आणि देशाप्रतीचे अधिकार याबाबत प्रेरित करण्याचे कार्य घटनेच्या माध्यमातून केले. आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाला त्यांना विनम्र अभिवादन करीत असल्याचे सांगितले.
ना.सुनील केदार यांनी बाबासाहेबांनी एकीकडे घटना तज्ञ म्हणून काम बघतानाच सामान्य माणसाच्या जीवनात जगण्याची उभारी निर्माण केली. माणसांनी माणसासोबत माणसाप्रमाणे वागावे अशी शिकवण देत त्यांनी विपरीत परिस्थितीत समाजात एकोपा निर्माण केला. त्यांच्या अतुलनीय समाजकार्याला अभिवादन करायला दीक्षाभूमीवर आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आज दिवसभरात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी दीक्षाभूमीवर महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन केले. एका वेगळ्या कार्यक्रमात विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, जिल्हाधिकारी विमला आर, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनीही दीक्षाभूमीवर आज अभिवादन केले वरील दोन्ही कार्यक्रमांना दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ सुधीर फुलझेले,विलास गजघाटे, भन्ते नाग दिपंकर आदी उपस्थित होते.
दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com