– सावनेर येथील दिवाणी वरीष्ठस्तर न्यायालयाचे लोकार्पण
– न्यायालयात आनंदी व खेळकर वातावरण ठेवा
– आदर्श न्यायालय म्हणून ओळखले जावे
– नेटकऱ्यांनी आधार विरहित भाष्य करु नये
नागपूर, दि. 24 : सावनेर येथील न्यायालय 1921 पासून कार्यरत असून शतकोत्तर प्रतिक्षेनंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येथे दिवाणी वरीष्ठ स्तर न्यायालय स्थापित झाले आहे. या न्यायालयामुळे नागरिकांना नागपूर येथे ये-जा करतांना होणारा होणारा त्रास कमी होऊन खटल्यांना होणारा विलंब टाळता येईल व आपले वाद गावातच सोडविता येतील. या न्यायालयामुळे जबाबदारीत वाढ होणार असून आनंदी व खेळकर वातावरणात वाद सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी केले. सावनेर येथे वरीष्ठ स्तर, दिवाणी न्यायालयाचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती वाल्मिकी एसए. मेनेझेस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल होते. तालुका वकील संघाच्या अध्यक्षा पल्लवी मुलमुले, दिवाणी वरिष्ठस्तर न्यायाधीश श्री.नायगावकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यात उमरेड वगळता फक्त सावनेर येथे दिवाणी वरिष्ठस्तर न्यायालय स्थापित करण्यात आले असून हे न्यायालय फ्रंटीयर न्यायालय व्हावे. एक आदर्श न्यायालय म्हणून ओळख व्हावी, अशी आशा न्यायमुर्ती शुर्के यांनी व्यक्त केली. न्यायदानाचा एक यशस्वी प्रयत्नासाठी एक शतक ओलांडावे लागले आहे. वरिष्ठ न्यायालयामुळे जबाबदारीत वाढ होणार असून अनावश्यक गोष्टी टाळाव्या, स्पर्धात्मक वातावरण न ठेवता खटल्यांना विलंब होणार नाही याकडे लक्ष द्यावे. पक्षकारांना दडपण येईल असे वातावरण न्यायालयात राहू नये. त्यांना समाधानाची पावती मिळायला हवी, अशा सूचना त्यांनी केल्या.
मतभेदानी सामाजिक स्वास्थ बिघडते ते होणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी न्यायालयाकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन बदलायला हवा. यासाठी आपले सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मिडियावरील कॉमेंटमुळे समाजमन दूषीत होते. त्यामुळे वैचारिक स्वातंत्र्य उपभोगतांना समाजमनावर काय परिणाम होईल, याची जाण ठेवून नेटकऱ्यांनी आधार विरहित भाष्य करु नये. अभ्यासपूर्ण भाष्य असेल तरच त्यांचे स्वागत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
न्यायालयात न्यायदान प्रक्रियेत साधनसामुग्रीचा अभाव, केसेसच्या नियोजनाचा अभाव यामुळे केसेसना विलंब होतो. यासाठी वेगळी पध्दत अवलंबून प्रकरण निकाली काढावेत. यासाठी मनन व चिंतनावर भर दया, असे त्यांनी यावेळी सांगितले.
‘न्याय आपल्या दारी’ या उक्तीप्रमाणे हे न्यायालय तालुकास्तरावर स्थापित करण्यात आले आहे. यामुळे निश्चित पक्षकारांना याचा लाभ होणार आहे. नागपूरला न्यायिक परंपरा लाभली असून नागपूरने देशाच्या न्याय व्यवस्थेला दोन सर्वोच्च न्यायमुर्ती दिले. नागपूरचे न्याय व्यवस्थेत मोलाचे स्थान आहे, असे न्यायमूर्ती वाल्मिकी एसए. मेनेझेस यांनी सांगितले.
शंभर वर्षाच्या प्रतिक्षेनंतर दिवाणी वरिष्ठस्तर न्यायालय सावनेर येथे स्थापित करण्यात आले असून यासाठी माजी मंत्री सुनील केदार यांनी शासनस्तरावर मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांनी सांगितले. वकीलांसाठीच नव्हे तर पक्षकारांना यामुळे दिलासा मिळाला आहे. सावनेर येथे 700 प्रलंबित केसेस आहेत, त्या सोडविण्यासाठी मदतच होणार आहे. यामुळे न्याय प्रक्रियेस गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याकार्यक्रमास आमदार सुनील केदार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. वकील संघाच्या अध्यक्षा पल्लवी मुलमुले यांनी दिवाणी न्यायालयासाठी केलेले प्रयत्न प्रास्ताविकात सांगतांना ऐडीजे न्यायालय सावनेर येथे व्हावे, अशी मागणी केली.
प्रारंभी कोनशिलेचे अनावरण करुन दिवाणी वरिष्ठस्तर न्यायालयाचे लोकापर्ण करण्यात आले, त्यासोबतच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचे आभार दिवाणी वरिष्ठस्तर न्यायाधीश श्री. नायगावकर यांनी मानले. यावेळी कळमेश्वर, काटोल येथील न्यायाधीश, वकील, न्यायालय प्रबंधक, ॲड. शैलेश जैन,ॲड. मनोज खंगारे ,ॲड. चंद्रकांत पिसे, ॲड. श्रीकांत पांडे, ॲड. भूपेंद्र पुरे ॲड.अभिषेक मुलमुले, नागरिक व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.