संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे आरोग्य व फिटनेस या विषयावर सात दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे समन्वयक डॉ.जयंतकुमार रामटेके यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कार्यशाळेच्या आयोजनामागचा उद्देश स्पष्ट केला व संपूर्ण कार्यशाळेची माहिती दिली. कार्यशाळेत विविध तज्ज्ञ आणि मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले पहिल्या दिवशी आरोग्य आणि पोषण या विषयावर डॉ. आलोक रॉय यांनी, दुसऱ्या दिवशी डॉ. प्रशांत बांबल यांनी निरोगी जीवनशैली, तिसऱ्या दिवशी डॉ. जयंत रामटेके यांनी बॉक्सिंग आणि आरोग्य, आशिया सुवर्णपदक विजेते डॉ. दिपाली साबणे, सेंट्रल स्कूल, कामठी यांनी खो-खो आणि आरोग्य, पाचव्या दिवशी विवेन जॉन, युटर्न फिटनेस, नागपूर, उत्तम आरोग्य मिळविण्यासाठी व्यायामाचे मूलभूत सिद्धांत, सहाव्या दिवशी अमित ठाकूर, बिकेसिपी हायस्कूल, कन्हान यांनी रस्साखेच आणि आरोग्य या विषयावर सविस्तर व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे मार्गदर्शकांनी समाधान केले. सात दिवसीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.विनय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, ती केवळ क्रीडांगणावरच मिळवता येते, असा मूलभूत मंत्र दिला. कार्यशाळेत सहभागी झालेल्या 60 नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी प्रथम स्थान करण घोघरे, कल्याणी यादव, द्वितीय क्रमांक रमाकांत गुजर, संध्या बावणे, तृतीय क्रमांक दीपक शरगत, त्सुनामी साहू यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ.मनिष चक्रवती, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.प्रशांत बांबल, इतिहास विभाग प्रमुख डॉ.जितेंद्र सावजी तागडे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्वेता तिवारी यांनी केले तर आभार डॉ इंद्रजित बसू यांनी मानले.