आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी यांनी घेतला गणेश विसर्जन व्यवस्येसंदर्भात आढावा
नागपूर : शहरातील पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी नागपूर महानगरपालिकेने तयारी केली आहे. महानगरपालिकेच्या उपक्रमाला नागरिकांसह गणेश मंडळांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागपुरातील सर्व तलावांमध्ये टिनाचे कठडे लावून मूर्ती विसर्जनावर बंदी घालण्यात आली असून, भाविकांसाठी चार फुटापर्यंतच्या गणेश विसर्जनासाठी ३५० कृत्रिम तलावाची व्यवस्था झोन स्तरावर करण्यात आलेली आहे.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी (५ सप्टेंबर) सकाळी गणेश विसर्जन व्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मुख्य अभियंता लीना उपाध्ये,उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त डॉ गजेंद्र महल्ले यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता प्रामुख्याने उपस्थित होते.
आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी बैठकीत काही विशेष निर्देश दिले. यात ४ फूट खालील सर्व श्रींच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम टॅंकमध्ये करण्यात यावे. तसेच ४ फुटावरील मूर्तीचे विसर्जन कोराडी येथील कृत्रिम तलावात आणि अन्य ठिकाणी करण्यात येईल. कोराडीमध्ये सर्व प्रकारची व्यवस्था जसे क्रेन, बॅरिकेटिंग, रोषणाईची उत्तम सुविधा करण्यात यावी. तसेच स्वच्छता सुद्धा ठेवावी. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दखल घ्यावी, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले.
याशिवाय कार्यकारी अभियंत्यांना नागपूर शहरातील सर्व गणेश मंडळाकडून माहिती गोळा करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहे. ज्यात मंडळांच्या श्रींची मूर्तीचे विसर्जन कुठे होणार आहे आणि ते कोणत्या मार्गाने मूर्तीच्या विसर्जनासाठी जाणार आहेत. आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, शहरात झोननिहाय विविध भागात, कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. तसेच चौकाचौकात व मैदानात कृत्रिम तलाव लावण्यात आले आहेत. शहरातील फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा आणि गांधीसागर या प्रमुख तलावासोबतच अन्य तलावावर लोखंडी टँकची व्यवस्था करण्यात आली आहे.
कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विसर्जनासोबतच निर्माल्य संकलनासाठी कलश ठेवण्यात आले आहेत. मनपाचे कर्मचारी व स्वयंसेवक निर्माल्य संकलन करणार आहेत. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी मजबूत लोखंडी बॅरिकेटिंग करण्यात यावे. याशिवाय विसर्जन परिसरात हायमास्ट लाइट लागतील. जागोजागी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. या कामात स्वयंसेवी संगठनेचे सुद्धा सहकार्य मिळत आहे.